राज्याला प्रकाश देणारा जिल्हा अंधश्रद्धेमुळे सामाजिक क्षेत्र काळोखात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:27 IST2021-09-11T04:27:58+5:302021-09-11T04:27:58+5:30
चंद्रपूर : मागील काही दिवसांत अंधश्रद्धेच्या चार घटनांनी संपूर्ण जिल्हा हलवून सोडला आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात उद्योगधंद्यांत पुढे ...

राज्याला प्रकाश देणारा जिल्हा अंधश्रद्धेमुळे सामाजिक क्षेत्र काळोखात
चंद्रपूर : मागील काही दिवसांत अंधश्रद्धेच्या चार घटनांनी संपूर्ण जिल्हा हलवून सोडला आहे. चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रात
उद्योगधंद्यांत पुढे असला आणि संपूर्ण महाराष्ट्राला प्रकाश देत असला तरी सामाजिक क्षेत्रातील काळोख या परिसरात
पाहावयास मिळतो. त्यामुळे अंधश्रद्धेबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने चंद्रपूर सिटिझन फ्रंट या संघटनेतर्फे जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या ॲड. वर्षा जामदार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात अंधश्रद्धा निर्मूलनासाठी ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ सतत कार्य करीत आहे. महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कायदे केलेले आहेत. परंतु, असे असतानाही एकविसाव्या शतकात अंधश्रद्धा अनेकांच्या मनात घर करून आहे. अगदी कोरोनामुळे झालेला मृत्यूसुद्धा जादूटोणा केल्यामुळेच झाला इथपर्यंत अंधश्रद्धा आमच्या डोक्यात बसली आहे. अशाप्रकारच्या भावना वक्त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून व्यक्त केल्या. कार्यक्रमात अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक अनिल दहागावकर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात अंधश्रद्धेच्या संदर्भात होत असलेल्या घटनांबद्दल अत्यंत भयानक अशा सद्यस्थितीचे वर्णन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांनी अंधश्रद्धा, नरबळी आणि जादूटोणाविरोधी कायदा जनतेसमोर मांडला. संचालन योगेश दूधपचारे, प्रस्तावना प्रा. सुरेश चोपणे तर आभार श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मजहर अली यांनी मानले.