धानोरकर गटाला जबर धक्का, चंद्रपूर मनपात स्थायीमध्ये विजय वडेट्टीवार गटाची सरशी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 14:25 IST2026-03-06T14:20:23+5:302026-03-06T14:25:43+5:30
Chandrapur : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील १६ सदस्यांच्या नावांवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी गुरुवारी (दि. ५ मार्च) आयोजित विशेष सभेत महापौरांनी विविध पक्षांच्या गटनेत्यांनी सुचविलेल्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली.

Dhanorkar group suffers a major setback, Vijay Vadettiwar group wins in Chandrapur Municipal Corporation permanent seat
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या स्थायी समितीतील १६ सदस्यांच्या नावांवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासाठी गुरुवारी (दि. ५ मार्च) आयोजित विशेष सभेत महापौरांनी विविध पक्षांच्या गटनेत्यांनी सुचविलेल्या सदस्यांची अधिकृत घोषणा केली. मात्र काँग्रेसकडून स्थायी समितीत पाठविण्यात आलेली सर्व सातही नावे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या गटाशी संबंधित असल्याने खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गटाला मोठा धक्का बसल्याची राजकीय चर्चा शहरात रंगली आहे.
स्थायी समितीत काँग्रेसचे ७, भाजपचे ६, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे २ आणि जनविकास सेनेचा १ सदस्य अशा एकूण १६ सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. काँग्रेसकडून वसंत देशमुख, सचिन कत्याल, राजेश अड्डूर, संजीवनी वासेकर, चंदा वैरागडे, सोफिया तवंगर आणि विनोद लभाने यांना संधी देण्यात आली आहे. भाजपकडून सुभाष कासनगोटूवार, संजय कचर्लावार, प्रज्वलांत कडू, सारिका सुंदरकर, सविता सरकार आणि पुष्पा उराडे यांची निवड झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून मनस्वी गिन्हे आणि श्रुती घटे यांची नावे निश्चित करण्यात आली असून जनविकास सेनेकडून पप्पू देशमुख स्थायी समितीत जाणार आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून स्थायी समितीत पाठविण्यात आलेल्या सातही सदस्यांचा संबंध आमदार विजय वडेट्टीवार गटाशी असल्याचा आरोप करत धानोरकर गटाच्या नगरसेवकांनी महानगरपालिका परिसरात काँग्रेस गटनेतृत्वाविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी समोर आली.