शेतकऱ्यांच्या पट्ट्यांसाठी नागभीडात वंचितचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 05:00 IST2021-07-04T05:00:00+5:302021-07-04T05:00:29+5:30
दावे टाकले असतानाही व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी जाणीवपूर्वक शेतीचे नुकसान करणे, शेतकऱ्यांना धमकी देणे असे प्रकार करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तात्काळ देण्यात यावेत.

शेतकऱ्यांच्या पट्ट्यांसाठी नागभीडात वंचितचे धरणे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : तालुक्यातील आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे मिळाले पाहिजेत, तसेच शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने शनिवारी नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
पिढ्यान्पिढ्या कसत असलेल्या आदिवासी व गैर आदिवासी जबरान जोत शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे शासनाने दिलेले नाहीत. शेतकऱ्यांनी शेतजमिनीचे पट्टे मिळाले पाहिजेत याकरिता जिल्हाधिकाऱ्यांकडे दावे टाकलेले आहेत.
दावे टाकले असतानाही व जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद व त्यांचे कर्मचारी जाणीवपूर्वक शेतीचे नुकसान करणे, शेतकऱ्यांना धमकी देणे असे प्रकार करीत आहेत. अशा शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे तात्काळ देण्यात यावेत. वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीद्वारे नागभीड तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून वन प्रशासन व प्रशासनाविरोधात नारेबाजी करण्यात आली.
या धरणे आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे, अरविंद सांदेकर, जिल्हा महासचिव जयदीप खोब्रागडे, सुभाष थोरात, अश्विनी मेश्राम, विलास श्रीरामे, शैलेंद्र बारसागडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.