लोकेश येरणेच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी

By Admin | Updated: February 28, 2016 01:13 IST2016-02-28T01:13:17+5:302016-02-28T01:13:17+5:30

खासगी शैक्षणिक संस्था व सामाजिक न्याय विभागाकडून ओबीसी विद्यार्थ्यांचा कसा छळ केला जातो आणि त्यातून विद्यार्थी कसा आत्महत्येसाठी प्रवृत्त होतो,

Demand for Lokesh Yerane's inquiry | लोकेश येरणेच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी

लोकेश येरणेच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : महात्मा फुले समता परिषदेचा पुढाकार
चंद्रपूर : खासगी शैक्षणिक संस्था व सामाजिक न्याय विभागाकडून ओबीसी विद्यार्थ्यांचा कसा छळ केला जातो आणि त्यातून विद्यार्थी कसा आत्महत्येसाठी प्रवृत्त होतो, याचा अनुभव लोकेश येरणे या विद्यार्थ्याच्या आत्महत्येच्या घटनेने आला आहे. लोकेशचा बळी खासगी शैक्षणिक संस्था व सामाजिक न्याय विभागाने घेतल्याची संतप्त प्रतिक्रिया येथे उमटत आहेत.
दरम्यान, याप्रकरणी लोकेश येरणे कुटूंबियांकडून नागपूर येथील जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात येथील रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर आता पोलीस काय कारवाई करतात, याकडे चंद्रपूरकरांचे लक्ष लागले आहे.
लोकेश हा नागपूर येथील जे.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत होता. त्याने द्वितीय वर्षात तृतीय सत्राची परीक्षा व प्रात्यक्षिकासाठी अर्ज केला होता. मात्र महाविद्यालयाच्या प्रशासनाने त्याच्याकडे १ लाख २० हजार रुपये शुल्काची मागणी केली होती. मात्र इतक्या तातडीने एवढी मोठी रक्कम भरण्याची लोकेशची आर्थिक परिस्थिती नसल्याने तो निराश झाला. त्याने महाविद्यालयाकडे मूळ कागदपत्रांचीही मागणी केली. परंतु ४० ते ५० हजार वार्षिक उत्पन्न असलेल्या परिवाराला हे शक्य नव्हते. आई सीमा विजय येरणे येथील एका खासगी शाळेत कार्यरत आहे, तर वडील विजय येरणे पानटपरीचा व्यवसाय करतात. भाऊ शुभम येरणे हा शिक्षण घेत आहे. विजय येरणे यांच्या वृद्ध आई अनसूया येरणे यांचीही जबाबदारी येरणे कुटुंबीयांवर आहे. येणाऱ्या मिळकतीवर घर चालविणे कठीण असताना अशा बेताच्या परिस्थितीत लोकेश कसाबसा शिक्षण घेत होता. त्याने ओबीसी स्कॉलरशिपसाठीचा अर्ज डिसेंबर २०१५ मध्ये भरल्यानंतर नियमानुसार महाविद्यालय प्रशासनाने पैसे मागायला नको होते. मात्र पैसे का मागितले हा प्रश्नच आहे. १ लाख २० हजार रुपये भरल्याशिवाय लोकेशचे मूळ कागदपत्र परत मिळणार नव्हते. ते कागपत्रे मिळावीत, यासाठी आईसुद्धा महाविद्यालयात गेली होती. मात्र पहिल्यांदा प्राचार्याला भेटूच दिले नाही. दुसऱ्यांदा गेली, तेव्हाही दाद मिळाली नाही.
शेवटी निराश होऊन कुठलेही थारा नसल्यामुळे शिकण्याची इच्छाशक्ती असूनसुद्धा पॉलिटेक्निक झालेला लोकेश मूळ कागदपत्र परत मिळत नसल्याने निराश झाला होता. यामुळे लोकेशला कुठेही छोटे-मोठे काम करता येत नव्हते. शेवटी निराश झालेल्या लोकेशने २० फेब्रुवारीला दुपारी २.३० ते ३ दरम्यान स्वत:च्या घरात गळफास लावून आत्महत्या केली.
दरम्यान, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जगदीश जुनगरी व महानगर अध्यक्ष सचिन तपासे यांनी लोकेशच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यानंतर लोकेशच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारासुद्धा दिला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष जगदीश जुनगरी, महिला अध्यक्षा प्रभा वासाडे, महानगराध्यक्षा संध्या दुधलकर, विवेक माटे, अनिल खरवडे, प्रशांत येवले, प्रकाश उमाटे, सुवासिनी आकनपल्लीवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Demand for Lokesh Yerane's inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.