मृत वाघाचे अवयव गायब, शिकारीच्या संशयावरून चौघांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 12:58 IST2026-03-25T12:57:29+5:302026-03-25T12:58:14+5:30
Chandrapur : चंद्रपूर वनविभागातील सावली परिक्षेत्रांतर्गत पाथरी उपक्षेत्रात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

Dead tiger's parts missing, four arrested on suspicion of poaching
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : चंद्रपूर वनविभागातील सावली परिक्षेत्रांतर्गत पाथरी उपक्षेत्रात एका वाघाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात वाघाच्या शरीराचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत आढळून आले असून, काही अवयव गायब असल्याने शिकारीचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान या प्रकरणात मंगळवारी चार संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले असनू त्यांना तीन दिवसांची वनकोठडी सुनावण्यात आली आहे.
दिवाकर सोनकर, सुरेश सोनकर उसरपार चक, ता. सावली, शिषुपाल मेश्राम गोंदिया, पिंटु दुमाने गडचिरोली अशी संशयित आरोपींची नावे आहेत. वनविभागाच्या माहितीनुसार, पाथरी येथील वन कक्ष क्रमांक २९८ मध्ये २३ मार्च २०२६ रोजी वाघाच्या मृतदेहाबाबत तक्रार प्राप्त झाली. तक्रारीची तत्काळ दखल घेत, वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली असता, दुपारी सुमारे १२ वाजता वाघाच्या शरीराचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत आढळले, तसेच काही अवयव घटनास्थळावरून गायब असल्याचे निदर्शनास आले. मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे. साहाय्यक वनसंरक्षक व्ही.श्री. तरसे आणि वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे यांची चमू तपास करत आहे. या तपासात एनटीसीएचे प्रतिनिधी बंडू धोतरे, डब्लूपीएसआयचे प्रतिनिधी मुकेश भांदककर, तसेच परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी दत्त जाधव यांचे सहकार्य लाभले.
वाघाची शिकार की नैसर्गिक मृत्यू ?
कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या वाघाचे काही अवयव गायब असल्याचे घटनास्थळाच्या पंचनाम्यावरून निदर्शनास आले. संबंधित वाघाचा नैसर्गिक मृत्यू झाला वा त्याची शिकार करण्यात आली, याबाबत वनविभागाकडून चौकशी सुरू आहे.