कोरोना निर्बंध उठले, मात्र विदर्भातील पॅसेंजर अद्यापही बंदच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2022 13:47 IST2022-03-25T13:43:00+5:302022-03-25T13:47:51+5:30
कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही.

कोरोना निर्बंध उठले, मात्र विदर्भातील पॅसेंजर अद्यापही बंदच
साईनाथ कुचनकार
चंद्रपूर : कोरोना संकटानंतर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या होत्या. संकट ओसरल्यामुळे केंद्र तसेच राज्य सरकारने निर्बंध उठविले आहेत. त्यामुळे आता सर्वच एक्स्प्रेस सुरू झाल्या आहेत. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील काही पॅसेंजर अद्यापही बंदच असल्याने सामान्य नागरिकांना प्रवास करणे कठीण होत आहे. विशेष म्हणजे, लहान-मोठ्या व्यावसायिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून रोजगारही हिरावला आहे.
कोरोना संकटानंतर आता जनजीवन रुळावर आले आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिक आपापल्या कामाला लागले असून परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. मात्र, मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने पॅसेंजर सुरूच केल्या नाही. विशेष म्हणजे, एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी बंद आहे. अपवादाला काही एसटी सुरू आहे. मात्र, ग्रामीण भागात त्याचा फारसा उपयोग नाही. त्यातच पॅसेंजरही बंद असल्याने नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. यामध्ये अतिरिक्त आर्थिक ताण सहन करावा लागत आहे.
या पॅसेंजर अद्यापही बंद
अमरावती-वर्धा
वर्धा-नागपूर
काजिपेठ- अजलनी
भाग्यनगरी-सिकंदराबाद (बल्लारशा)
बल्लारपूर-गोंदिया
खासगी वाहन परवडेना
जवळपासच्या प्रवासासाठी पॅसेंजरने कमी खर्चात प्रवास होतो. त्यामुळे सामान्य कुटुंबातील नागरिक पॅसेंजरने प्रवास करण्याला पसंती देतात. मात्र, पॅसेंजर बंद असल्यामुळे प्रवास करणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. कुटुंबातील एखाद्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्या. त्याच्या घरापर्यंत जाण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. परिणामी, सामान्य कुटुंबातील सदस्य जाण्याचे टाळत आहेत.
कोरोना संकट आता ओसरले आहे. त्यामुळे फारशी भीती राहिली नाही. त्यातच केंद्र तसेच राज्य सरकारनेही कोरोना निर्बंध उठविले आहे. त्यामुळे पॅसेंजर बंद ठेवून गरिबांना वेठीस धरण्याचा प्रयत्न केला जात आहे. सामान्यांच्या सुलभ प्रवासासाठी बंद असलेल्या सर्व पॅसेंजर सुरू करणे गरजेचे आहे.
-श्रीनिवास सुंचुवार, झेडआरयूसीसी सदस्य, मध्य रेल्वे