मानव-वन्यजीव संघर्षात चंद्रपूर देशात अग्रस्थानी ! वर्षभरात ४७ जणांचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 17:52 IST2025-12-31T17:51:06+5:302025-12-31T17:52:13+5:30
Chandrapur : वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाने भयावह स्वरूप धारण केले. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.

Chandrapur leads the country in human-wildlife conflict! 47 people killed in a year
शंकरपूर : वाघांचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यात २०२५ या वर्षात मानव-वन्यजीव संघर्षाने भयावह स्वरूप धारण केले. १ जानेवारी ते ३० डिसेंबर २०२५ या कालावधीत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात तब्बल ४७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर विविध कारणांमुळे १२ वाघ व ५ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. या आकडेवारीमुळे चंद्रपूर जिल्हा मानव-वन्यजीव संघर्षाच्या बाबतीत देशात अग्रस्थानी पोहोचल्याचे वास्तव समोर आले आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे जागतिक पातळीवर प्रसिद्ध असलेला हा जिल्हा, आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या मानवी बळींमुळे ओळखला जाऊ लागला आहे, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत २६ लोकांचा बळी गेला आहे. तर १ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत २९ लोकांचा बळी गेला आहे. या दोन्ही वर्षांच्या तुलनेत यावर्षी ही वाढ दीड पटीने झालेली आहे त्यामुळे वाघासाठी प्रसिद्ध असलेला हा चंद्रपूर जिल्हा आता वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात होणाऱ्या बळीमध्ये भारतात अग्रस्थान निर्माण करीत आहे.
वनविभागासमोर मोठे आव्हान
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा वाघ व बिबट्यांच्या मृत्यूची संख्या काहीशी कमी असली, तरी मानवी बळींच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ ही वनविभागासाठी गंभीर डोकेदुखी ठरत आहे. वाढते जंगलालगतचे मानवी वस्ती क्षेत्र, रोजगारासाठी जंगलावर अवलंबून असलेले नागरिक, अपुरे प्रतिबंधात्मक उपाय आणि सतर्कतेचा अभाव या कारणांमुळे संघर्ष अधिक तीव्र होत असल्याचे चित्र आहे. गोंडपिपरी व चिमूर तालुक्यात तर वनविभागाविरोधात आंदोलनही करण्यात आले होते.
वनविभागानुसार मानवी मृत्यू
मध्य चांदा वनविभाग : ३
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प : ११
ब्रह्मपुरी वनविभाग : १९
एफडीसीएम : ३
चंद्रपूर प्रादेशिक वनविभाग : ११
एकूण मृत्यू: ४७
बिबट मृत्यू : ५
मध्य चांदा : १
ब्रह्मपुरी : ३
चंद्रपूर : १
वाघ मृत्यू: १२
मध्य चांदा : १
चंद्रपूर : १
ताडोबा : ५
एफडीसीएम : १
ब्रह्मपुरी : ४