प्रेयसीवर चाकूनं 16 सपासप वार करून प्रियकराचं विषप्राशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 17:52 IST2018-11-27T17:49:12+5:302018-11-27T17:52:13+5:30
दोघांची प्रकृती चिंताजनक; रुग्णालयात उपचार सुरू

प्रेयसीवर चाकूनं 16 सपासप वार करून प्रियकराचं विषप्राशन
चंद्रपूर: मुलीच्या कुटुंबीयांनी विरोध दर्शवल्यानं प्रियकरानं प्रेयसीवर सपासप १६ वार केल्याची घटना घडली आहे. यानंतर त्यानं स्वतः विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. या दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांना नागपूरला हलवण्यात आलं आहे. चिमूरपासून 10 किमीवरील नंदारा येथे आज दुपारी 2 वाजता हा प्रकार घडला. चिमूर पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
चिमूर तालुक्यातील नंदारा येथील चेतन सुरेश गजभे (वय २२ वर्षे) याचे गावातील 18 वर्षीय तरुणीसोबत गेल्या तीन चार वर्षांपासून प्रेमप्रकरण सुरू होते. चेतननं या मुलीच्या आई-वडिलांकडे लग्नाची मागणी घातली असता त्यांनी नकार दर्शवला. त्यामुळे संतप्त चेतन गावाबाहेर प्रेयसीची महाविद्यालयातून परत येण्याची वाट पाहत होता. ती येताच त्यानं तिला अडवून मारहाण सुरू केली. यानंतर त्यानं खिशातून धारदार चाकू काढून तिच्यावर सपासप वार करण्यास सुरुवात केली.
यावेळी तिच्यासोबत असलेली मैत्रिणी घाबरून गावाकडे ओरडत सुटली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चिमूर पोलीस स्टेशनला याबद्दलची माहिती दिली. प्रेयसीवर चाकूनं वार केल्यानंतर चेतनने हताश होऊन जीवन संपवण्यासाठी विष प्राशन केले. जखमी प्रेमीयुगुलाना पोलीस विभागानं तात्काळ धाव घेऊन उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. प्रकृती गंभीर असल्यानं मुलीपाठोपाठ मुलालाही नागपूरला हलवण्यात आलं.