गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात बीड, रायगडचे पोलीस राज्यात प्रथम
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:24 IST2022-07-11T13:23:29+5:302022-07-11T13:24:55+5:30
पोलीस तपासाला मदतीसाठी क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) सुरू करण्यात आली आहे.

गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात बीड, रायगडचे पोलीस राज्यात प्रथम
परिमल डोहणे -
चंद्रपूर : तंत्रज्ञानाच्या युगात पोलीस विभागाला ऑनलाइन करण्यासाठी राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) सीसीटीएनएस प्रणालीची अंमलबजावणी केली. गुन्हेगारांची पार्श्वभूमी जाणून घेण्यासाठी ही प्रणाली पोलिसांना फायदेशीर आहे. या प्रणालीचे मे महिन्यात मूल्यमापन करण्यात आले. यामध्ये चंद्रपूर पोलिसांनी २४२ पैकी २२७ गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांकाची रँकिंग पटकावली असून, चंद्रपूर पोलिसांचे नाव उज्ज्वल केले आहे. यात पहिली रँकिंग बीड व रायगडने पटकावली आहे.
ऑनलाइन युगात पोलीस विभागही ऑनलाइन झाला आहे. कुठेही कोणतीही घटना घडली किंवा कोणत्याही ठाण्यांतर्गत गुन्हा नोंद झाला, तर त्याची माहिती सीसीटीएनएस प्रणालीवर ऑनलाइन पद्धतीने भरली जाते. सीसीटीएनएस प्रणाली संपूर्ण देशात अवलंबविण्यात आली आहे. या प्रणालीअंतर्गत आयसीजेएस पोर्टल लिंक करण्यात आले आहे. या पोर्टलच्या आधारावर पोलीस विभाग कोणत्याही गुन्हेगाराची पार्श्वभूमी क्षणात बघू शकतात. त्याच्यावर कोणत्या ठिकाणी किती गुन्हे आहेत. याबाबतही त्यांना माहिती मिळते. मे महिन्यात याचे मूल्यांकन करण्यात आले. यात पहिला क्रमांक बीड व रायगड, दुसरा क्रमांक चंद्रपूर, औरंगाबाद ग्रामीण, जालना यांनी पटकावून आपले नाव राज्यात चमकाविले आहे.
काय आहे सीसीटीएनएस प्रणाली?
पोलीस तपासाला मदतीसाठी क्राइम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टम (सीसीटीएनएस) सुरू करण्यात आली आहे. यात कोणत्याही प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती अद्ययावत केली असते. प्रथम खबरी अहवाल अर्थात एफआयआर ते आरोपपत्र दाखल होईपर्यंत इत्थंभूत माहितीचा यात समावेश होतो. गुन्ह्याचा तपास, घटनास्थळ, अटक मुद्देमाल जप्त अशी माहिती असते.
तीन महिने साइटवर असते एफआयआर
- कुठेही कोणतीही घटना घडली तरीही त्याची माहिती सीसीटीएनएस प्रणालींतर्गत किमान ४८ तासांच्या आत ऑनलाइन अपलोड केली जाते. साधारणत: ती एफआयआर तीन महिने या साइटवर असते.
- सिटिझन डॉट महापोलीस डॉट जीओव्ही डॉट इन या साइटवर सर्वसामान्य नागरिकसुद्धा एफआयआरची पाहणी सहज करू शकतात. महिला विरोधातील अत्याचारविरोधातील तक्रारी सोडून सर्वच एफआयआर येथे पाहता येऊ शकते.