‘सुंदर’ धान पुरामुळे झाले कुरुप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 06:00 IST2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:42+5:30
निसगार्चा लहरीपणा, वेळोवेळी पावसाची हुलकावणी, पावसाळ्यात शेवटी पावसाने साथ दिली नाही तर पाण्याअभावी धान पिक धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते. धान पिकास शेवटपर्यत पाण्याची गरज असते. त्यामुळे ज्या ठिकाणी कृत्रिम पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या धान पिकाची रोवणी करतात.

‘सुंदर’ धान पुरामुळे झाले कुरुप
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील शेतकरी अरुण पिलारे यांनी यावर्षी खरीब हंगामात आपल्या शेतात ‘सुंदर’ जातीच्या धान पिकाची रोवणी केली. समाधानकारक पाऊस, योग्य हवामान यामुळे सुंदर धान पीक नावाप्रमाणेच चांगलं बहरुन आले. सुंदर धान प्रजाती कमी कालावधीत येणारी असल्याने मागील आठवड्यात धानाचा पूर्णपणे निसवाही झालेला होता. धान पिकाच्या लोंबाचे सौंदर्य पाहून सदर शेतकरी आनंदीत होऊन चांगल्या उत्पादनाचे स्वप्न मनात रंगवत असतानाच मागील आठवडयात ब्रम्हपुरी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या पुराने मात्र सदर शेतकऱ्याचे धान पीक भुईसपाट होऊन सुंदर धान पिकाचे सौंदर्य पुराच्या पाण्याने हिरावून घेतल्याने जवळपास ३० ते ४० हजार रुपयांचे नुकसान झाल्याने सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.
निसगार्चा लहरीपणा, वेळोवेळी पावसाची हुलकावणी, पावसाळ्यात शेवटी पावसाने साथ दिली नाही तर पाण्याअभावी धान पिक धोक्यात येण्याची शक्यता जास्त असते. धान पिकास शेवटपर्यत पाण्याची गरज असते. त्यामुळे ज्या ठिकाणी कृत्रिम पाण्याची सोय नाही, अशा ठिकाणी शेतकरी कमी कालावधीत येणाऱ्या धान पिकाची रोवणी करतात. ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव येथील अरुण पिलारे या शेतकऱ्याने सुद्धा आपल्या शेतात कमी कालावधीत येणाऱ्या सुंदर प्रजातीच्या धानाची रोवणी केली होती.
परंतु ब्रम्हपुरी तालुक्यात मागील आडवडयात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने मात्र सदर शेतकऱ्याचे शेतातील धान पीक पूर्णपणे भूईसपाट झाले. यामुळे सदर शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून हातात आलेले धानपीक अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराच्या पाण्यात सडल्याने सदर शेतकऱ्याचे बरेच मोठे नुकसान झाले असून सदर शेतकऱ्याला त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.