बळीराजाची आर्त हाक
By Admin | Updated: May 7, 2014 02:02 IST2014-05-07T02:02:01+5:302014-05-07T02:02:01+5:30
शेती व्यवसाय पोट भरण्याचे नाही तर राष्ट्रीय उत्पादनाचे मोठे साधन आहे.

बळीराजाची आर्त हाक
: लघु पाटबंधारे विभाग सुस्त शेतकर्यांच्या हिताचा प्रकल्प केव्हा साकारणार?
अनेकश्वर मेश्राम बल्लारपूर शेती व्यवसाय पोट भरण्याचे नाही तर राष्ट्रीय उत्पादनाचे मोठे साधन आहे. आर्थिक विकास यामुळे साधता येतो. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे शेतकर्यांचे कंबरडे मोडले जात आहे. सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आडकाठीचे धोरण अवलंबिले जात आहे. यासाठी बळीराजा आर्त हाक देत आहे. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी उपसा सिंचन प्रकल्प शेतकर्यांच्या हिताचा असून केव्हा तो आकारास येईल, याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. यावर लघु पाटबंधारे विभागाचे सुस्तीचे धोरण चिंतेत वाढ करणारे असल्याचे दिसून येत आहे. बल्लारपूर तालुक्यातील पळसगाव-आमडी उपसा सिंचन प्रकल्पामुळे पळसगाव, आमडी, कळमना, कोर्टीमक्ता, कोर्टीतुकूम, जोगापूर, आष्टी, बामणी (दुधोली), लावारी, दहेली आदी गावांतील शेतकर्यांची २ हजार ८९० हेक्टरमधील शेती क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे शेतकर्यांचे राहणीमान उंचावणार आहे. शेतीच्या माध्यमातून त्यांचा आर्थिक स्तर भरभराटीला येणार आहे. शेतकर्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती सुधारणार आहे. मात्र सदर प्रकल्पाचे काम पूर्णत्वास गेल्यास व प्रकल्पाचे पाणी शेतीला मिळाल्यानंतरच ते शक्य होणार आहे. यासाठी लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांनी प्रकल्प तडीस नेणे तेवढेच गरजेचे आहे. या प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची १६ जुलै २०१० ला तत्वत: मान्यता प्राप्त झाली. वन जमीन व पर्यावरण विभागाकडून २३ मे २००८ ला हिरवी झेंडी मिळाली आहे. प्रकल्पाला पूर्ण करण्यासाठी खासगी जमिनीचे ७६.०५ हेक्टर भूसंपादन तर वन जमिनीचे ११.५० हेक्टर क्षेत्र संपादित करण्याची प्रक्रिया पूर्णत्वास नेण्यात आली. प्रकल्पासाठी आवश्यक बाबी पूर्ण करण्यात आल्या असूनही प्रकल्पाच्या कामाला गतिमान का करण्यात येत नाही, ही बाब न समजणारी आहे. विदर्भ पाटबंधारे विभागाने निविदा काढून बांधकामाचे कंत्राट दिले आहे. परंतु लघु पाटबंधारे विभागाचे नियंत्रण नसल्यामुळे प्रकल्पाचे काम रखडल्याचे दिसून येत आहे. पळसगाव-आमडी सिंचन प्रकल्पाच्या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरूवात करण्यात आली. सदर प्रकल्प २०१३ पर्यंत पूर्ण करण्यासंदर्भात लघु पाटबंधारे विभागाने नियोजन केले होते. मात्र बांधकाम कंत्राटदार व विभागातील अधिकार्यांच्या दुर्लक्षामुळे आजघडीला प्रकल्पाचे काम अर्धवट अवस्थेत रखडले आहे. चंद्रपूर येथील लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी प्रस्तावित खर्चाचे नियोजन करताना सन २०१०-१ १ मध्ये चार कोटी ५० लाख रुपये, सन २०११-१२ मध्ये चार कोटी रुपये तर सन २०१२-१३ वर्षात दोन कोटी रुपये खर्च नियोजित केला होता. मात्र प्रकल्प पूर्ण होण्याचे घोडे का अडले, हे समजू शकले नाही. सिंचन प्रकल्प पूर्ण करा ४बल्लारपूर तालुक्यातील कळमना गावापासून दोन किलोमीटर अंतरावर वर्धा नदीच्या डाव्या काठावर उपसा सिंचन प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे. सदर प्रकल्प जल समृध्दीच्या माध्यमातून या भागातील शेतकर्यांना प्रगतीची संधी देणारा आहे. कोट्यवधींच्या निधीतून साकारणारा प्रकल्प विकासाचा केंद्रबिंदू ठरणारा आहे. शेतकर्यांच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावणारा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी लघु पाटबंधारे विभागाने वैग वाढवून पळसगाव-आमडी सिंचन प्रकल्प त्वरीत पूर्ण करण्याची मागणी कळमनाचे सरपंच घनश्याम उरकुडे, पळसगावचे सरपंच बंडू वासाडे, आमडीचे सरपंच सुरेश वासाडे, कोर्टीमक्ताचे सरपंच दिलीप सोयाम, उपसरपंच गोविंदा उपरे यांनी केली. पळसगाव-आमडी सिंचन प्रकल्पाची वैशिष्ट्ये पाण्याचा होणारा वापर - २६.१४ द.ल.घ.मी. नदीतील पाण्याची पातळी - १५६.७५५ मीटर पंप फ्लोअर पाणी पातळी - १७४.६०० मीटर प्रकल्पाची सिंचन क्षमता - ३६ हजार ६९९ हेक्टर प्रकल्पाची एकूण किंमत - सात कोटी ३७ लाख ८८ हजार कालव्याची लांबी - उजवा कालवा ४.६९ किलोमीटर डावा कालवा १.३७ किलोमीटर