दारूच्या नशेत शिवीगाळ, मारहाण ; त्रासाला कंटाळून मुलाने नायलॉन दोरीने गळा आवळून केली बापाची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 13:39 IST2026-02-24T13:37:18+5:302026-02-24T13:39:08+5:30
Chandrapur : दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाणीच्या त्रासाला कंटाळून मुलाने आपल्या वडिलांची नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना भिसी येथे सोमवारी उघडकीस आली आहे.

Abused and beaten while drunk; Tired of the harassment, the son strangled his father with a nylon rope and killed him
लोकमत न्यूज नेटवर्क
चिमूर / भिसी : दारूच्या नशेत शिवीगाळ आणि मारहाणीच्या त्रासाला कंटाळून मुलाने आपल्या वडिलांची नायलॉन दोरीने गळा आवळून हत्या केल्याची घटना भिसी येथे सोमवारी उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. मच्छिंद्र आनंदराव मेश्राम (वय ५१) असे मृत वडिलांचे, तर संदेश मच्छिंद्र मेश्राम (वय १९) असे आरोपी मुलाचे नाव आहे.
मच्छिंद्र मेश्राम दारूच्या नशेत आपली पत्नी आणि मुलाला शिवीगाळ करून मारहाण करत असत. रविवार, २२ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास मच्छिंद्र मेश्राम दारूच्या नशेत घरी आले आणि त्यांनी लहान मुलगा संदेश याला शिवीगाळ केली. संदेशने वडिलांना समजावत जेवण करण्यास सांगितले. मात्र, वडिलांनी जेवण नाकारून पुन्हा दारू पिण्यास जाण्याचा हट्ट धरला. याच वादातून संदेशचा राग अनावर झाला आणि त्याने नायलॉन दोरीने वडिलांचा गळा आवळून हत्या केली.
भावाला फोन करून सांगितली आपबीती
घटनेच्या वेळी आरोपीची आई लग्नानिमित्त बाहेरगावी गेली होती. सोमवारी सकाळी आरोपी संदेशने आपला मोठा भाऊ पंचशील मेश्राम याला फोन करून सर्व हकिकत सांगितली. पंचशीलने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता वडील जमिनीवर मृतावस्थेत आढळले. त्यानंतर पंचशीलने स्वतः भिसी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार दिली.
भिसीचे ठाणेदार मंगेश भोंगाडे यांनी आरोपी संदेश मच्छिंद्र मेश्राम विरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम १०३ (१) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. ठाणेदार मंगेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
आत्महत्या केल्याचा बनाव
संदेशने पोलिसांना वडिलांनी आत्महत्या केल्याची बतावणी केली. मात्र पोलिसी खाकी दाखवल्यानंतर त्याने संपूर्ण घटनाक्रम पोलिसांच्या पुढे कथन केला.
रात्रभर गावात फिरत राहिला
पित्याचा गळा आवळल्यानंतर संदेशने मृतदेहावर ब्लॅकेट टाकले. मात्र त्याने याबाबत कुणालाही काही सांगितले नाही. घरात दुसरे कोणीही नसल्याने हा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही. रात्रभर तो वॉर्डात फिरत राहिला. सकाळी त्याने स्वतःहून आपल्या मोठ्या भावाला फोन करून या भीषण कृत्याची माहिती दिली.