गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार ! शिक्षकाने ६ विद्यार्थिनींशी केले अश्लील वर्तन; पोक्सो अंतर्गत ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 13:25 IST2026-02-21T13:22:37+5:302026-02-21T13:25:23+5:30
Chandrapur : समाजाला दिशा देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला.

A case that tarnishes the relationship between teacher and student! Teacher behaved indecent with 6 students; booked under POCSO
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : समाजाला दिशा देण्याचे पवित्र कार्य करणाऱ्या एका वर्गशिक्षकाने आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी अश्लील चाळे करून गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारा प्रकार चंद्रपूर शहरात उघडकीस आला.
चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका नामांकित शाळेत शुक्रवारी (दि.२० फेब्रुवारी) हा संतापजनक प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी गोवर्धन गोंडाणे (५१) या नराधम शिक्षकाला पोक्सो अंतर्गत बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शाळेतील शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची कुणकुण शहर पोलिसांना लागली होती. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने शाहनिशा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार एका महिला पोलिस कर्मचाऱ्याने साध्या वेशात शाळेत जाऊन चौकशी केली.
प्राथमिक तपासात तथ्य आढळताच महिला व बालविकास विभाग आणि चाइल्डलाइनच्या मदतीने विद्यार्थिनींशी संवाद साधला. यावेळी एकापाठोपाठ एक अशा सहा मुलींनी या नराधम शिक्षकाच्या कृत्यांचा पाढाच वाचला. त्यावरून त्याला अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ प्रमोद चौगुले, ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात पीएसआय पल्लवी काकडे, पीएसआय तृप्ती खंडाईत आदींनी केली.
शाबासकीच्या बहाण्याने 'बॅड टच' आरोपी गोवर्धन गोंडाणे हा मागील अनेक वर्षांपासून याच शाळेत कार्यरत होता. मुलींनी दिलेल्या तक्रारीनुसार, तो वर्गात शिकवताना मुलींकडे अत्यंत घाणेरड्या नजरेने पाहायचा. शाबासकी देण्याच्या नावावर शरीराला अश्लील स्पर्श करणे, मांडीला हात लावणे आणि संगणक लॅबमध्ये एकट्या विद्यार्थिनीला बोलावून अश्लील चाळे करणे, असे कृत्य त्याचे नित्याचेच झाले होते. कधी-कधी तो मुलींना 'घरी कधी नेता?' अशी विचारणा करून अश्लीलतेची सीमा ओलांडत होता.
पीडित मुलींची संख्या वाढण्याची शक्यता
आरोपी शिक्षक गोंडाणे याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता, त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हा शिक्षक अनेक वर्षांपासून याच शाळेत असल्याने, त्याने यापूर्वीही अशाच प्रकारे इतर विद्यार्थिनींची छेड काढली असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिस आता त्या दिशेनेही तपास करत असून, आणखी काही पीडित मुली समोर येण्याची शक्यताही वाढली आहे.