१२ हजार शिक्षक पदभरतीसाठी ‘तारीख पे तारीख’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:50 PM2019-04-17T13:50:40+5:302019-04-17T13:52:19+5:30

राज्य शासनाने १२ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र मागील सहा महिन्यांपासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागांकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. यामुळे पात्रताधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फार्स ठरणार, असा प्रश्न विचारू लागले आहेत.

12 thousand teachers in trouble for recruitment | १२ हजार शिक्षक पदभरतीसाठी ‘तारीख पे तारीख’

१२ हजार शिक्षक पदभरतीसाठी ‘तारीख पे तारीख’

Next
ठळक मुद्देपात्रताधारक उमेदवार त्रस्त पसंतीक्रम नोंदविण्याची प्रतीक्षा

परिमल डोहणे
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्य शासनाने १२ हजार जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया सुरू केली. मात्र मागील सहा महिन्यांपासून पसंती क्रमांक देण्यासाठी शिक्षण विभागांकडून वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. यामुळे पात्रताधारक उमेदवार त्रस्त झाले असून शिक्षक भरती होणार की केवळ फार्स ठरणार, असा प्रश्न विचारू लागले आहेत.
राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांच्या २४ हजार रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्याची घोषणा शासनाने केली होती. या घोषणेमुळे डीटीएड व बीएड पदवीकाधारकांनी मोठ्या उत्साहाने तयारी सुरू केली. मात्र, केवळ १२ हजार जागा भरतीसाठी शासनाने पवित्र पोर्टल सुरू करून पहिल्याच टप्प्यात राज्यातील हजारो उमेदवारांचा हिरमोड केला. पण, नोकरीअभावी हैराण झालेल्या उमेदवारांनी टीईटी आणि अभियोग्यता चाचणी (टीएआयटी) उत्तीर्ण उमेदवारांनी मोठ्या आशेने पवित्र पोर्टलवर अर्ज केले. अर्ज पडताळणी झाल्यानंतर पात्रताधारकांना स्वत:च्या आवडीच्या शाळेसाठी आता केवळ पसंतीक्रमाक द्यावयाचा होता. दरम्यान, शिक्षण विभागाने ५ मार्चपासून सदर जागांसंबंधी पवित्र पोर्टलवर पसंती नोदवावे, असे कळविण्यात आले होते. परंतु, ४ मार्च रोजी परिपत्रक जारी करून ११ मार्चपासून पसंती क्रमांक देण्यास सुरुवात होईल, अशाही सुचना दिल्या. त्यानंतर ८ व २६ एप्रिल आणि आता ३० एप्रिल रोजी पसंती क्रमांक देण्यासाठी पोर्टल सुरूहोईल, असे परिपत्रकाद्वारे नमूद करून पुन्हा संभ्रम निर्माण करण्यात आला. परिणामी, शिक्षण विभागाचे हे ‘तारीख पे तारीख’ धोरण उमेदवारांसाठी तापदायक ठरले आहे.

विभागीय स्तरावरही हिरमोड
पात्रताधारकांना पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीसाठी अर्ज करायचा होता. मात्र पोर्टल सुरू झाल्यापासूनच अर्ज भरणाऱ्यांना अग्निदिव्यातून सामोरे जावे लागत आहे. अनेकांनी पोर्टलद्वारे अर्ज केला तेव्हा अर्ज सेल्फ सर्टिफिकेट झाले नाही तर अनेकांच्या प्रिंट निघाल्या नाही. हजारो उमेदवारांना स्वयंप्रमाणपत्र अपडेट करताना अडचणी आल्या होत्या. या समस्या सोडविण्यासाठी पात्रताधारकांना विभागीय स्तरावर बोलविण्यात आले. पण, समस्या जैसे थे आहेत.

सात याचिकांमध्ये अडकली प्रक्रिया
शिक्षक भरती प्रक्रियेविरूद्ध उच्च न्यायालयात सात याचिका दाखल झाल्या आहेत. इंग्रजी माध्यमातील २० टक्के आरक्षणाबाबत अंतरिम निर्णय आला. पण, हाही प्रश्न पूर्णत: सुटला नाही. या याचिकांवर न्यायालयात सुनावणी झाल्याशिवाय भरती प्रक्रियेचे ग्रहण सुटणार नाही, अशी राज्यातील स्थिती आहे.

एकत्रित सुनावणीसाठी न्यायालयाला विनंती करणार
शिक्षक भरती प्रक्रियेसाठी विशेष संगणक प्रणाली तयार आहे. परंतु, न्यायालयात याचिका प्रलंबित असल्याने यासंदर्भात निर्णय घेता येणार नाही. राज्यात दाखल झालेल्या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला येत्या १५ दिवसांत केली जाणार आहे. सकारात्मक निकाल लागल्यास मे महिन्यापासून उमेदवारांना संस्थांसाठी प्राधान्यक्रम भरता येईल.
-विशाल सोलंकी, शालेय शिक्षण आयुक्त, पुणे
 

Web Title: 12 thousand teachers in trouble for recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Teacherशिक्षक