गाडी पार्किंगवरून रंगला वाद, तरुणानं सोसायटीच्या सचिवांचं कापलं नाक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 18:42 IST2025-05-27T18:40:48+5:302025-05-27T18:42:24+5:30
Crime News : एका छोट्याशा कारणावरून सोसायटीमध्ये वाद सुरू झाला आणि या वादात एका तरुणाने त्यांच्या सोसायटी सचिवांचं नाक कापलं.

गाडी पार्किंगवरून रंगला वाद, तरुणानं सोसायटीच्या सचिवांचं कापलं नाक!
सोसायटी म्हटलं की वेगवेगळे वाद आणि तंटे अशा गोष्टी नेहमीच होत असतात. कधीकधी अशी भांडणं हाणामारीचं रूप देखील घेतात. मात्र, आता एक असं धक्कादायक प्ररण समोर आलं आहे, ज्यामध्ये एका छोट्याशा कारणावरून सोसायटीमध्ये वाद सुरू झाला आणि या वादात एका तरुणाने त्यांच्या सोसायटी सचिवांचं नाक कापलं. ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील कानपूरच्या बिठूर गावात घडली आहे. दोघांमध्ये पार्किंगच्या मुद्द्यावरून भांडण सुरू झालं होतं.
नेमकं काय झालं?
बिठूर गावातील एका सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या क्षितिज नामक व्यक्तीने त्याच्या राखीव पार्किंग क्षेत्रात कुणा दुसऱ्याच व्यक्तीची गाडी बघितली. हे पाहताच त्याने सोसायटीच्या सचिव रुपेंद्र यांना फोन करून खाली बोलावलं. यावर रुपेंद्र यांनी गार्डला सांगून गाडी हटवून घ्या, असा सल्ला दिला. मात्र, चिडलेल्या क्षितिजने त्यांना खाली उतरून येण्यास सांगितलं. रुपेंद्र खाली येताच क्षितिजने त्यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी क्षितिजने त्यांना मारहाण देखील केली. त्यांच्या नाकाचा जोरदार चावा घेऊन रुपेंद्र यांना जखमी केलं.
सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली घटना!
या घटनेबद्दल कळताच सोसायटीतील इतर सदस्य देखील हैराण झाले. जखमी रुपेंद्र यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. ही संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सध्या रुपेंद्र यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आपल्या ताब्यात घेतलं असून, त्या आधारे पुढची कारवाई केली जाणार आहे.