अमेरिका नाही, 'हे' देश भारतीयांना देतात सर्वाधिक पगार; जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:40 IST2025-08-30T18:40:09+5:302025-08-30T18:40:53+5:30
भारतील लाखो लोक नोकरी करण्यासाठी परदेशात जातात.

अमेरिका नाही, 'हे' देश भारतीयांना देतात सर्वाधिक पगार; जाणून घ्या...
भारतील लाखो लोक नोकरी करण्यासाठी परदेशात जातात. परदेशात काम करण्यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे, चांगला पगार आणि चांगली जीवनशैली. जेव्हा आपण परदेशात काम करणाऱ्या भारतीयांबद्दल बोलतो, तेव्हा सर्वात आधी अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि मध्य पूर्वेतील देशांची नावे येतात. मात्र, गेल्या काही वर्षांत युरोपीय देशांमध्येही भारतीयांची संख्या वाढली आहे.
आता प्रश्न असा आहे की, जगातील कोणते देश भारतीयांना सर्वाधिक पगार देतात आणि अमेरिकेत जाण्यासाठी इतकी स्पर्धा का आहे?
कोणता देश भारतीयांना सर्वाधिक पगार देतो?
स्वित्झर्लंड जगातील सर्वोत्तम आणि मजबूत अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. येथे भारतीयांना खूप चांगला पगार मिळतो. स्वित्झर्लंड वित्त, बँकिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि घड्याळ बनवण्यासारख्या क्षेत्रांसाठी ओळखला जातो. येथील सरासरी पगार दरवर्षी १.७४ कोटी रुपयांपर्यंत असू शकतो. याशिवाय, जर तुम्ही आशियातील कोणत्याही देशात सर्वाधिक पगार शोधत असाल, तर जपान हा एक उत्तम पर्याय असू शकतो. जपानमध्ये आयटी, सॉफ्टवेअर आणि रेस्टॉरंट उद्योगात काम करणाऱ्या भारतीयांना खूप चांगला पगार मिळतो. येथे वर्षाला सरासरी ३६ लाख रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.
हे देश भारतीयांना चांगला पगार देतात
आइसलँड हा एक युरोपियन देश आहे, जिथे परदेशी लोकांना काम करण्यासाठी खूप चांगला पगार मिळतो. येथे भारतीय कामगारांना पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते. आइसलँडमध्ये काम केल्याने दरवर्षी सरासरी ६० लाख रुपये पगार मिळू शकतो, जो युरोपातील इतर देशांपेक्षा खूप जास्त आहे. लक्झेंबर्ग हा एक लहान देश आहे, परंतु भारतीयांना येथे चांगला पगार मिळतो, विशेषतः बँकिंग, दूरसंचार आणि वित्त क्षेत्रात सरासरी वार्षिक ६८ लाख रुपये पगार मिळू शकतो.
हाँगकाँग हे जगातील सर्वात मोठ्या आर्थिक केंद्रांपैकी एक मानले जाते. येथे काम करणाऱ्या भारतीयांना दरमहा सरासरी $४,१७५ (सुमारे ३.५१ लाख रुपये) पगार मिळतो. सिंगापूर हा देखील एक असा देश आहे, जिथे भारतीयांना खूप चांगला पगार मिळतो. येथे सरासरी पगार $४,७६५ (सुमारे ४ लाख रुपये) दरमहा आहे.
अमेरिकेत जाण्याची ओढ का?
अमेरिका हा जगभरातील लोकांचा आवडीचा देश आहे. येथे दरवर्षी हजारो भारतीय कामानिमित्त जातात. येथे काम करण्याचे अनेक फायदे आहेत. आयटी, उत्पादन, औषधनिर्माण आणि जैवतंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांमध्ये काम करून भारतीयांना दरवर्षी सरासरी ५७ लाख रुपयांपर्यंत पगार मिळतो. यामुळेच अमेरिकेत नोकरी मिळविण्यासाठी भारतीयांमध्ये गर्दी असते.