शेतकऱ्याच्या मुलाला फेसबुकमध्ये मिळाली 1.8 कोटी रुपयांची नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 12:00 IST2022-06-27T11:59:37+5:302022-06-27T12:00:28+5:30
Jadavpur University student : बिसाख मंडल सप्टेंबरमध्ये फेसबुक जॉईन करेल. त्यांची पोस्टिंग लंडनमध्ये झाली आहे.

शेतकऱ्याच्या मुलाला फेसबुकमध्ये मिळाली 1.8 कोटी रुपयांची नोकरी
नवी दिल्ली : कोलकाता येथील जाधवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यावर पैशांचा पाऊस पडला आहे. कॅम्प्युटर सायन्सच्या अंतिम वर्षाचा विद्यार्थी असलेल्या बिसाख मंडलला फेसबुककडून 1.8 कोटी रुपयांचे पॅकेज मिळाले असून त्याने ते स्वीकारले आहे.
बिसाख मंडल हा बीरभूम येथील रामपुरहाट गावातील एका मध्यम कुटुंबीयातील आहे. त्याचे वडील शेतकरी असून आई अंगणवाडी सेविका आहे. बिसाख याने 1.8 कोटींचे पॅकेज मिळवून आपल्या आई-वडिलांचा अभिमान वाढवला आहे.
बिसाख मंडल सप्टेंबरमध्ये फेसबुक जॉईन करेल. त्यांची पोस्टिंग लंडनमध्ये झाली आहे. तो म्हणाला, "मी सप्टेंबरमध्ये फेसबुक जॉईन करणार आहे. ही नोकरी स्वीकारण्यापूर्वी मला गुगल आणि अॅमेझॉनकडून ऑफर मिळाल्या. मला वाटले की, फेसबुक निवडणे चांगले आहे कारण त्यांनी देऊ केलेले वेतन पॅकेज जास्त आहे. साहजिकच माझे पालक खूप आनंदी आहेत."
आपल्या विद्यार्थ्याच्या यशाने जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक भारावून गेले आहेत. बिसाख यांनी सांगितलेकी माझे प्राध्यापक खरोखरच आनंदी आहेत. नोकरीची ऑफर मिळाल्यानंतर मी त्यांच्याशी वैयक्तिकरित्या बोललो आणि त्यांच्यापैकी काहींना भेटलो.
दरम्यान, याआधी जाधवपूर विद्यापीठाच्या 9 विद्यार्थ्यांना 1 कोटींहून अधिकचे पॅकेज मिळाले होते. हे सर्व विद्यार्थी इंजिनीअरिंगचे आहेत. तसेच, लवकरच लंडनला जाण्याची तयारी सुरू करणार असल्याचे बिशाख यांनी सांगितले आहे.