10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरी, पगारही चांगला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 19:22 IST2025-08-08T19:21:24+5:302025-08-08T19:22:45+5:30
Indian Navy recruitment 2025: भारतीय नौदलात नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे

10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भारतीय नौदलात नोकरी, पगारही चांगला!
भारतीय नौदलातनोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. भारतीय नौदलाने सिव्हिलियन ट्रेड्समन (ग्रुप- सी) पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती अंतर्गत एकूण १ हजार ६६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. १३ ऑगस्ट २०२५ पासून अर्जप्रक्रियेला सुरुवात होणार आहे. तर, २ सप्टेंबर २०२५ अर्ज करण्याची शेवटची तारीख असेल. त्यानंतर कोणत्याही व्यक्तीचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. या भरतीसंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
वयोमर्यादा
सिव्हिलियन ट्रेड्समन (ग्रुप-क) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे आणि कमाल वय २५ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय, विशेष श्रेणीतील उमेदवारांना वयातही सूट देण्यात येईल. अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना वयोमर्यादेत ५ वर्षे, इतर मागासवर्गीय उमेदवारांना वयोमर्यादेत ३ वर्षे आणि दिव्यांग उमेदवारांना वयोमर्यादेत १० वर्षे सूट देण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता
या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असलेला उमेदवार भारतातील मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतून १० उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिवाय, उमेदवाराने अप्रेंटिसशिप प्रशिक्षण पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
निवड प्रक्रिया
लेखी परीक्षेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल. लेखी परीक्षेत उमेदवारांना जनरल इंटेलिजेन्स आणि रीजनिंग, सामान्य जागरूकता, कॉन्टिटेटिव्ह एप्टीट्यूड आणि इंग्रजी विषयासंदर्भात १०० गुणांचे प्रश्न विचारले जातील. परीक्षेचा कालावधी दोन तास निश्चित करण्यात आला आहे.
किती पगार मिळणार?
या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना दरमहा १९,९०० ते ६३,२०० रुपये वेतन दिले जाईल.