Hurry up unemployed youth! Amazon India will hire 20,000 employees | बेरोजगार तरुणांनो त्वरा करा! अ‍ॅमेझॉन इंडिया भरणार २० हजार कर्मचारी

बेरोजगार तरुणांनो त्वरा करा! अ‍ॅमेझॉन इंडिया भरणार २० हजार कर्मचारी

नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील बलाढ्य कंपनी अ‍ॅमेझॉन इंडिया आपल्या ग्राहक सेवा (कस्टमर सर्व्हिस) शाखेत २० हजार हंगामी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे. कंपनीच्या वतीने अधिकृतरीत्या ही घोषणा करण्यात आली आहे.

आगामी सहा महिन्यांचा काळ हा सणासुदीचा काळ असून, जागतिक पातळीवर सुट्यांचा हंगाम सुरू होणार आहे. त्यानुसार आपल्या वेबसाइटवरील ऑनलाइन खरेदी वाढणार असल्याचा कंपनीचा अंदाज आहे. त्यानुसार नवी भरती केली जाणार आहे. ही भरती हैदराबाद, पुणे, कोईमतूर, नोएडा, कोलकाता, जयपूर, चंदीगड, मंगळुरू, इंदूर, भोपाळ आणि लखनौ या शहरांसाठी होणार आहे.

कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कंपनी कटिबद्ध असून, त्यासाठी ही भरती केली जात आहे. यातील बहुतांश पदे ‘कस्टमर सर्पोट व्हर्टिकल्स’मधील आहेत. बारावी पास मुलेही यासाठी अर्ज करू शकतात. इंग्रजी, हिंदी, तमिळ, तेलुगू अथवा कन्नड या भाषांवर प्रभुत्व असणे आवश्यक आहे.

कंपनीने म्हटले की, ग्राहक सेवा संस्थेत आमच्या संख्याबळाच्या गरजांचा आम्ही सातत्याने आढावा घेत असतो. त्यानुसार भरतीचे निर्णय घेतले जातात. भारतीय आणि जागतिक सुट्यांच्या हंगामामुळे आगामी सहा महिन्यांत ग्राहकही वाढणार आहे. त्यासाठी आवश्यक संख्याबळाची कंपनीची गरजही वाढणार आहे.

२०२५ पर्यंत एक दशलक्ष नवे रोजगार
अ‍ॅमेझॉन इंडियाच्या ग्राहक सेवा विभागाचे संचालक अक्षय प्रभू यांनी सांगितले की, नव्याने भरती होणाºया कर्मचाऱ्यांना कंपनी कार्यालयातून अथवा घरी बसून कंपनीच्या आभासी ग्राहक सेवा कार्यप्रणालीवर काम करावे लागेल. २०२५ पर्यंत भारतात एक दशलक्ष नवे रोजगार निर्माण करण्याची अ‍ॅमेझॉनची योजना आहे. त्यासाठी कंपनी बाजारात एक अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष स्वरूपाचे जे काही रोजगार तयार होतील, ते बहुविध उद्योग क्षेत्राशी संबंधित असतील. त्यात माहिती तंत्रज्ञान, कौशल्य विकास, मजकूर निर्माण, किरकोळ विक्री, रसद आणि वस्तू उत्पादन यांचा समावेश आहे. मागील सात वर्षांत अ‍ॅमेझॉनने भारतात ७ लाख रोजगार निर्माण केले आहेत.

Web Title: Hurry up unemployed youth! Amazon India will hire 20,000 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.