अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी

By ब्रह्मानंद जाधव | Published: October 17, 2023 06:42 PM2023-10-17T18:42:45+5:302023-10-17T18:42:55+5:30

पुरातन काळातील दंडकारण्यातील डोंगर कुशीत म्हणजे आजच्या अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी जाज्वल्य शक्तिपीठ आहे.

Udo of the Mother in the temple resting on the ridge of Mount Ajanta Udo Shaktipeeth Adishakti Mardadi Devi | अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी

अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेल्या मंदिरात मातेचा उदो..उदो...; शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी

धाड : पुरातन काळातील दंडकारण्यातील डोंगर कुशीत म्हणजे आजच्या अजिंठा पर्वताच्या रांगेत विसावलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी जाज्वल्य शक्तिपीठ आहे. या मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची गर्दी जमली आहे. शक्तिपीठ आदिशक्ती मर्दडी देवी मातेच्या मंदिरात मातेचा उदो-उदो होत आहे. 

निसर्गाच्या सानिध्यात वसलेले श्रीक्षेत्र मर्दडी देवी मंदिर भव्य आणि पुरातन असून या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी वर्षभर भाविक गर्दी करतात. या ठिकाणी लग्न, जावळे, मनोरथ पूर्ण, पोळ्याची कर, चैत्र पौर्णिमा, नवरात्रीत सातत्याने भक्तांची गर्दी राहते. तर वर्षभरात तीन वेळा मोठा यात्रा उत्सव राहतो. बुलढाणा -छत्रपती संभाजीनगर रोडवर धाडपासून आठ कि.मी. अंतरावर मर्दडी देवीचे मंदिर आहे. शिवशक्तीचे एकाच ठिकाणी वास्तव्य दुर्मिळ आहे. याच मंदिरात मर्दडी देवीच्या समोरच स्वयंभू महादेवाचे मंदिर आहे. 

मंदिराच्या परिसरातूनच बाणगंगा या नदीचा उगम होतो. शिव आणि शक्तीसोबतच विष्णू अवतारातील भगवान परशुराम, गणपती, सरस्वती, तेलाई देवी, हनुमान या देवतांच्या मूर्ती आणि मंदिराच्या आवाराच्या आत आहेत. या ठिकाणी आल्यावर बुलढाणा रोडपासून पश्चिमेला थोडेच अंतर चालून गेल्यावर काहीशा पायऱ्याखाली उतरून गेल्यावर भव्य मंदिर दृष्टीस पडते. परिसरात वटवृक्षाचे मोठी झाडे हातात हात घातल्यागत मंदिर परिसरात सावली आणि गारवा निर्माण करतात. लगेचच थोडं खाली उतरून गेल्यावर उजव्या हाताला एक चौकोनी पाण्याचा कुंड आहे आणि वर दगडी गोमुख आहे, यावर एक पोकळ खोबणी आहे. आत गेल्यावर आणखी तीन ठिकाणांहून पाणी येताना दिसते. भाविक या गोमुखातून पडणाऱ्या पाण्यानं शुचिर्भूत होऊन देवीच्या दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करतात. आत गेल्यावर दगडी सभामंडप दिसतो आणि पुरातन हेमाडपंती बांधणीचे मंदिर दिसते. आत गेल्यावर डावीकडे मोठ्या गाभाऱ्यात मर्दडी देवीची सुंदर मूर्ती दिसते. सोबत बाजूला भगवान परशुरामाची मूर्ती आहे. उजव्या बाजूला गणपती, सरस्वती, तेलाई देवीचे मंदिर आहेत. मर्दडी देवीसमोर महादेवाचे मंदिर आहे, तर या सर्वांच्या मधोमध यज्ञकुंड तयार करण्यात आले आहे. बाहेर आल्यावर दक्षिणेकडे एक मोठे सभागृह आहे, यामध्ये हनुमंताची मूर्ती आहे.

Web Title: Udo of the Mother in the temple resting on the ridge of Mount Ajanta Udo Shaktipeeth Adishakti Mardadi Devi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.