मध्यरात्री संशयास्पद वाहनाच्या पाठलागाचा थरार, दानापूर रोडवर गायीसह वाहन सोडून चोरटे पसार
By सदानंद सिरसाट | Updated: August 28, 2023 16:03 IST2023-08-28T16:03:20+5:302023-08-28T16:03:20+5:30
वाहनात सापडलेल्या संशयास्पद वस्तूवरून घटनेचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

मध्यरात्री संशयास्पद वाहनाच्या पाठलागाचा थरार, दानापूर रोडवर गायीसह वाहन सोडून चोरटे पसार
वडगाव वान : चारचाकी वाहनातून संग्रामपूर तालुक्यातील वकाणा येथून गायीची तस्करी होत असल्याच्या माहितीवरून नागरिकांनी पाठलाग केला असता चोरट्यांनी गायीचा दोर कापून सोडून दिले. त्यानंतर वरवट बकाल येथून पोलिसांनी पाठलाग केल्याने वडगाव वान गावालगत दानापूर रोडवर वाहन सोडून चोरटे पसार झाल्याची घटना रविवारी रात्री १२ वाजताच्या दरम्यान घडली.
चारचाकी (क्रमांक एमएच-१२, केएन ९४४२) वाहनातून रविवारी रात्री चोरी केलेल्या गायीची तस्करी होत असल्याचा संशय संग्रामपूर तालुका बजरंग दल कार्यकर्त्यांना आला. त्यांनी नागरिकांच्या मदतीने वाहनाचा पाठलाग केला. त्यावेळी चोरट्यांनी गायीचा दोर कापून सोडून देत सुसाट निघाले. नागरिकांनी तामगाव पोलिसांना माहिती दिली. रात्रगस्त पथकाची गाडी वरवट बकाल येथेच असल्याने पोलिसांनीही पाठलाग केला. त्यामुळे वडगाव वान गावाजवळ वरवट-दानापूर रस्त्यावर गाडी सोडून देत चोरटे पसार झाले. वाहनात सापडलेल्या संशयास्पद वस्तूवरून घटनेचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.