खामगावात जुन्या वादातून तिघींवर प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2025 01:28 IST2025-02-12T01:27:56+5:302025-02-12T01:28:31+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नगर भागातील दोन कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता.

खामगावात जुन्या वादातून तिघींवर प्राणघातक हल्ला, एकीचा मृत्यू
खामगाव : जुन्या वादातून एका व्यक्तीने तीन महिलांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी (ता. ११) रात्री ११ वाजताच्या सुमारास शहरातील शंकरनगर भागात घडली. या हल्ल्यात संध्या सुरेश घाटे या जखमी झाल्यात. त्यांचा अकोला येथील सर्वोच्च रुग्णालयात उपचारादरम्यान झाला. मनोरमा सुरेश घाटे, हर्षा सुरेश घाटे या दोघी गंभीर जखमी झाल्या आहेत. आरोपी गोलू चरण सारसर याने हा हल्ला केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शंकर नगर भागातील दोन कुटुंबांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. मंगळवारी रात्री हा वाद पुन्हा उफाळून आला आणि दोन्ही कुुटुंबामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर गोलू सारसरने तिन्ही महिलांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.
या हल्ल्यात जखमी झालेल्या संध्या घाटे (४५, रा. शंकर नगर) या महिलेचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाला, तर मनोरमा घाटे आणि हर्षा घाटे या गंभीर जखमी असून, त्यांच्यावर खामगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्ला करणारा आरोपी पसार झाला असून, पोलिस रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेत होते. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक करत आहेत.