सेल्फीच्या नादात पुलावरून नदीपात्रात पडून एकाच कुटुंबातील तीघांनी गमावला जीव
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 19:25 IST2018-08-22T19:21:06+5:302018-08-22T19:25:50+5:30
खामगाव: सेल्फी काढण्याच्या नादात पुलावरून पुर्णा नदीपात्रात पडून एकाच कुटुंबातील तिघांना जलसमाधी मिळाली

सेल्फीच्या नादात पुलावरून नदीपात्रात पडून एकाच कुटुंबातील तीघांनी गमावला जीव
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: सेल्फी काढण्याच्या नादात पुलावरून पुर्णा नदीपात्रात पडून एकाच कुटुंबातील तिघांना जलसमाधी मिळाली. ही घटना संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा येथे बुधवारी सायंकाळी ५ वाजता दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अकोला जिल्ह्यातील कवठा बहादुरा येथील राजेश गुलाबराव चव्हाण हे जळगाव जामोद येथील बुलडाणा अर्बन बॅकेत सेवारत आहे. बुधवारी बँकेला सुटी असल्यामुळे ते आपल्या गावी आले होते. शेगाव येथून जळगाव जामोदकडे परतत असताना पूर्णा नदीवरील पूर पाहण्यासाठी चव्हाण कुटुंबिय खिरोडा पुलाच्या पायथ्याशी थांबले. त्यावेळी त्यांचा १० वर्षांचा मुलगा सेल्फी काढत होता. चिखलामुळे पाय घसरल्याने तो पाण्यात पडला. मुलगा पाण्यात पडल्याचे दिसताच, राजेश चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांनी मुलाला पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघांचाही तोल गेला. पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे तिघेही पुराच्या पाण्यात वाहून गेले.