कामगार मंत्र्यांनी केले मनोभावे वंदन; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले बाप्पांचे सारथ्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 15:08 IST2025-09-06T15:07:09+5:302025-09-06T15:08:26+5:30
मंगलमूर्ती मोरया... बाप्पा मोरयाच्या जयघोषात श्री गणेशाला भावपूर्ण निरोप

कामगार मंत्र्यांनी केले मनोभावे वंदन; जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केले बाप्पांचे सारथ्य!
खामगाव (जि. बुलढाणा) : येथील श्री गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीत मानाचा लाकडी गणपती सहभागी झाल्यानंतर शनिवारी सकाळी १०:०५ वाजता फरशी येथून सुरूवात झाली. येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत २९ गणेश मंडळे सहभागी आहेत. मानाच्या लाकडी गणपतीच्या रथावर न चढता राज्याचे कामगार मंत्री तथा खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आ. आकाश फुंडकर यांनी श्री गणेशाचे फरशी येथे मनोभावे दर्शन घेऊन वंदन केले. लाकडी गणेशाच्या रथाचे सारथ्य जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर निलेश तांबे यांनी केले. विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांकडून विविध सामाजिक आणि प्रबोधनात्मक देखावे सादर करण्यात आले.
मिरवणुकीत तानाजी गणेश मंडळ, एकता, मृत्युंजय, त्रिशूल आणि गांधी चौकातील वंदे मातरम् मंडळाने विविध मनोरंजनात्मक देखावे सादर केले. हे देखावे आबालवृद्धांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. या देखाव्यांसह श्री हनुमान गणेश मंडळाच्या व विविध आखाड्यांच्या मल्लांनी सादर केलेल्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी अनेकांचे लक्ष वेधले. श्रींच्या विसर्जन मिरवणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी खामगाव शहरात पुरेसा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मान्यवरांकडून मानाच्या गणपतीचे पूजन
सकाळी ७:१५ वाजता अय्याची कोठी येथे मानाच्या लाकडी गणपतीची आरती करण्यात आली. आरतीनंतर लाकडी गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरूवात झाली. मिरवणुकीला सुरुवात होण्यापूर्वी जिल्हा पोलिस अधीक्षक नीलेश तांबे, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉ. श्रेणिक लोढा, लाकडी गणेश मंडळाचे अध्यक्ष सुरज अग्रवाल, मुख्य व्यवस्थापक आर. बी. अग्रवाल, संजय झुनझुनवाला यांच्यासह मान्यवरांनी आरती केली. फरशी येथे मिरवणूक आल्यानंतर राज्याचे कामगार मंत्री तथा खामगाव मतदारसंघाचे आमदार ॲड. आकाश फुंडकर मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोकसिंह सानंदा, अलकादेवी सानंदा, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील उपस्थित होते.
गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर चोख बंदोबस्त !
शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण पवार, शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे निरिक्षक सुरेंद्र अहीरकर, एलसीबी पीआय सुनील अंबुलकर, अशोक लांडे आदी पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली.