भीषण! चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात; एक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2024 23:29 IST2024-07-31T23:26:25+5:302024-07-31T23:29:05+5:30
खामगाव- मेहकर रस्त्यावरील घटना.

भीषण! चारचाकी आणि दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात; एक जागीच ठार
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: चारचाकी आणि दुचाकीच्या धडकेत एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना बुधवारी रात्री साडे आठ वाजताच्या दरम्यान खामगाव - मेहकर रस्त्यावर घडली.
प्राप्त माहितीनुसार, नागपूर येथील काही तरूण एमएच ४९ बीडब्ल्यू ८२९३ या चारचाकी वाहनाने समृद्धी महामार्गावरून मेहकर मार्गे शेगाव येथे दर्शनासाठी येत होते. त्याचवेळी एमएच २७ एई ५१३३ या क्रमांकाच्या दुचाकीने कंचनपूर येथील राम महाजन आणि अनंता लागे दुचाकीने जात होते. मात्र आंबेटाकळीसमोर दुचाकी आणि चारचाकीचा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील राम महाजन यांचा जागीच मृत्यू झाला. तर अनंता लागे गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ अकोला येथे हलविण्यात आले. तर चारचाकी वाहनातील युवक किरकोळ जखमी झाले.
या घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रत्यक्षदर्शीच्या मदतीने जखमीला खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. तर मृतक राम महाजन यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आला. अपघाताची माहिती मिळताच आंबेटाकळी आणि कंचनपूर येथील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले होते.