अंढेरा : येथे १८ फेब्रुवारी रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या हरबरा, गहू, शाळू, मका, फळबागा, कांदा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी, अशी मागणीही होत आहे. तालुका कृषी अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे.
शेतकऱ्यांचे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. १८ फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणात पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. तालुका कृषी अधिकारी आर.के. मासळकर, मंडळ कृषी अधिकारी सतीश दांडगे, कृषी पर्यवेक्षक रमेश मोरे, कृषी सहायक मनोज काठोडे, वैशाली खेडेकर आदींनी अंढेरा मंडळातील गारपिटीने नुकसान झालेल्या पाडळी शिंदे, शिवणी, आरमाळ, अंढेरा आदी गावांतील पिकांची पाहणी केली. खरीप हंगाम सततच्या पावसाने पिकांची नासाडी झाली. तालुका उशिराने का होईना, दुष्काळ ग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात आला होता व शासनाने हेक्टरी दहा हजार रुपये दोन हेक्टरपर्यंत मदत जाहीर केली होती. ३१ डिसेंबरला दुष्काळ ग्रस्त यादीत देऊळगाव राजा तालुक्याचा समावेश करण्यात आला. त्याला दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही प्रत्यक्षात मदत मिळालेली नाही. खरीप पिकांचा पीकविमा शेतकरी वर्गानी काढलेला होता, परंतु पीक नुकसानीची माहिती सदर कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सूचना देण्यात आली होती. विमा संरक्षण माहितीवरील एक नंबर चुकीचा होता, तर एका क्रमांकांवर वारंवार संपर्क करून संपर्क हाेत नव्हता. त्यामुळे अनेक विमाधारक शेतकरी, यामुळे आपल्या पिकांच्या नुकसानीची माहिती कंपनीच्या टोल फ्री नंबरवर देऊ शकले नाहीत. पीक नुकसानाची माहिती विमाधारक शेतकऱ्यांना अँड्रॉइड मोबाइलच्या ॲपमधून देण्याची सूचना कंपनीने केली हाेती. मात्र, बहुतांश शेतकरी यांच्याकडे स्मार्ट फोन नाहीत. नेट नाही, त्यात बॅलन्स नाही. या मुळे पीक नुकसान माहिती विमाधारक शेतकरी कंपनीला माहिती देऊ शकले नाहीत, त्यामुळे सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी हाेत आहे.