कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'लालपरी' आली धावून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 17:19 IST2020-04-28T17:19:14+5:302020-04-28T17:19:44+5:30
या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगराच्या १० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी 'लालपरी' आली धावून
- ब्रह्मानंद जाधव
बुलडाणा: राजस्थानमधील कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी अखेर राज्य परिवहन महामंडळाची लालपरीच धावून आली आहे. पश्चिम वºहाडातील १९० विद्यार्थी ३ मेपर्यंत स्वगृही परतणार आहेत. या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगराच्या १० बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.
कोरोना विषाणुचा प्रसार रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू आहे. आयआयटी, मेडिकल प्रवेश परीक्षा व इतर शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी राजस्थानमधील कोटा येथे जातात. लॉकडाउनमुळे महाराष्ट्रातील सुमारे १ हजार ७६४ विद्यार्थी कोटा येथे अडकलेले आहेत. या विद्यार्थ्यांना घरी परत आणण्याची मागणी गेल्या कित्येक दिवसांपासून पालकांमधून होत होती. त्यानंतर शासनाने कोटामध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत घोषणा केली होती. परंतू त्यांना आणण्याची कुठलीच व्यवस्था करण्यात आली नव्हती. विद्यार्थ्यांना परत आणण्याबाबत स्थानिक प्रशासनाकडूनही कुठलीच माहिती मिळत नसल्याने पालकांची चिंता वाढली होती.
दरम्यान, जिल्हा प्रशासनाने आपल्या जिल्ह्यातील अडकलेल्या विद्यार्थ्यांची माहिती शासनास सादर केली. त्यानुसार वरिष्ठ पातळीवरून या विद्यार्थ्यांना परत आणण्याच्या अनुषंगाने हालचाली सुरू झाल्या. अखेर विद्यार्थ्यांना राज्य परिहवन महामंडळाच्या बसेसमधून परत आणले जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सध्या कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना धुळे जिल्ह्यातील आगारामधून बसेस जाणार आहेत. जे विद्यार्थी ज्या जिल्ह्यात आहेत, त्यांना ह्या बसेसच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यात येणार आहे.
यामध्ये अमरावती विभागातील १९० विद्यार्थ्यांसाठी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा आगारातून १० बसेस सोडण्यात येणार आहेत. त्यात अकोला, अमरावती जिल्ह्यासाठी चार व बुलडाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यांसाठी सहा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे.