समृद्धीवर धावत्या खासगी लक्झरी बसला आग; ५२ प्रवासी थोडक्यात बचावले
By निलेश जोशी | Updated: January 6, 2026 10:29 IST2026-01-06T10:29:20+5:302026-01-06T10:29:56+5:30
Samruddhi Mahamarg Bus Fire: बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने बस थांबवून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. यात काही जण किरकोळ जखमी झाले.

समृद्धीवर धावत्या खासगी लक्झरी बसला आग; ५२ प्रवासी थोडक्यात बचावले
बुलढाणा: समृद्धी महामार्गावर मंगळवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. नागपूरवरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एका खासगी प्रवासी बसला अचानक आग लागून संपूर्ण बस जळून खाक झाली. दरम्यान आग लागल्याची घटना वेळेत लक्षात आल्याने प्रवाशांना आधीच सुखरूप बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला.
बसमधील सर्व ५२ प्रवाशी सुखरूप असल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. परंतू ही बस पुर्णत: जळून खाक झाली आहे. बसला आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने बस थांबवून प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. यात काही जण किरकोळ जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. ही बस नागपूरवरून मुंबईकडे जात होती. बसला आग लागण्याचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. ही दुर्घटना सिंदखेड राजा तालुक्यातील दुसरबीड गावाजवळ असलेल्या शिवनी पिसा परिसरात घडली. या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र महामार्ग पोलिस व स्थानिक पोलिसांनी मिळून वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान दोन वर्षापूर्वी समृद्धी महामार्गावर खासगी बसला आग लागून त्यात जवळपास २२ हून अधिक प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता.