पूजेला रेती आणण्यासाठी गेलेल्या बुडणाऱ्या तीन मुलींना वाचवले

By योगेश देऊळकार | Published: September 18, 2023 04:17 PM2023-09-18T16:17:35+5:302023-09-18T16:18:43+5:30

भास्तन येथील वैष्णवी मिरगे, ज्ञानेश्वरी मिरगे, पूनम मिरगे या चुलत बहिणी हरतालिकेच्या पुजेसाठी पूर्णा नदीकाठी गेल्या होत्या.

Rescued three drowning girls who had gone to fetch sand for worship | पूजेला रेती आणण्यासाठी गेलेल्या बुडणाऱ्या तीन मुलींना वाचवले

पूजेला रेती आणण्यासाठी गेलेल्या बुडणाऱ्या तीन मुलींना वाचवले

googlenewsNext

जलंब : हरितालिकेच्या पूजेसाठी नदीपात्रातून रेती आणण्यास उतरलेल्या तीनपैकी एका मुलीचा पाय घसरल्याने तीला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर दोघीही पूर्णा नदीत पडल्याने तिघींचा जीव धोक्यात आला. हा प्रकार तेथे उपस्थित युवकांच्या लक्षात येताच त्यांनी नदीपात्रात उडी घेऊन या मुलींना जीवदान दिले. अंगावर काटा आणणारा हा थरार १८ सप्टेंबर रोजी सकाळी पूर्णा नदीच्या भास्तन पुलानजिक घडला.

भास्तन येथील वैष्णवी मिरगे, ज्ञानेश्वरी मिरगे, पूनम मिरगे या चुलत बहिणी हरतालिकेच्या पुजेसाठी पूर्णा नदीकाठी गेल्या होत्या. एकमेकींचा हात धरून रेती काढण्याचा प्रयत्न करताना त्यांचा तोल गेला. तीघीही नदीपात्रात पडल्या. त्यांनी आरडाओरड केल्याने हा प्रकार दिनेश माकोडे या युवकाच्या लक्षात आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता नदीपात्रात उडी घेतली. पाण्याच्या प्रवाहाचा वेग जास्त असल्याने त्याने प्रथम दोन मुलींना नदीकाठी आणले. मात्र, तिसऱ्या मुलीला वाचविण्याच्या प्रयत्नात असतानाच त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तोही गोंधळून गेला. मुलीसह तो युवकही बुडत असल्याचे समजताच शिवाजी मिरगे व मनोज मिरगे या युवकांनी नदीपात्रात उडी घेऊन मुलीसह त्या युवकाला काठावर आणले. एकमेकांचा जीव वाचविण्यासाठीचा हा जीवघेणा व सीनेस्टाईल संघर्ष तेथे उपस्थित इतर महिला व ग्रामस्थांनी प्रत्यक्ष अनुभवला. अखेर मुलींसह युवक पाण्याबाहेर आल्यानंतर सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

साडीला दगड बांधून वाचविण्याचा प्रयत्न

पुरात बुडालेल्या तीनही मुलींना वाचविणारा युवक व यापैकी एक मुलगी बुडत असल्याचे उज्वला तांदूळकर यांच्या लक्षात आले. यावेळी त्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने अंगावरच्या साडीला दगड बांधत नदीपात्रात भिरकावला. या साडीला बांधलेल्या दगडाच्या आधारे युवकाने मुलीसह नदीकाठ गाठण्याचा प्रयत्न केला. महिलेने घाबरून जोरजोरात किंचाळ्या केल्याने इतर दोन युवकांनी नदीपात्रात उडी घेऊन युवकासह मुलीचा जीव वाचविला. महिलेने ऐनवेळी दाखवलेल्या समयसूचकतेने त्यांचे प्राण वाचले.

सकाळी परिवारासह नदीवर गेलो होतो. पत्नीला नदीकाठी सोडल्यानंतर पुलावर त्यांची वाट बघत उभा हाेतो. यावेळी तीन मुली नदीच्या पाण्यात बुडाल्याने महिलांनी आरडाओरड केली. हे लक्षात येताच त्यांना वाचविण्यासाठी नदीत उडी घेतली. मुलींचा जीव वाचला, याचा आनंद आहे. - दिनेश माकोडे, भास्तन

Web Title: Rescued three drowning girls who had gone to fetch sand for worship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.