रामगया पाठोपाठ पापहरेश्वर तीर्थही आटले, लोणारमधील प्राचीन वारसा धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 17:39 IST2019-04-23T17:28:05+5:302019-04-23T17:39:21+5:30
जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाणी असलेला रामगया झरा गेल्या नऊ वर्षापासून आटला असतानाच आता अखंड वाहत असलेले पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे

रामगया पाठोपाठ पापहरेश्वर तीर्थही आटले, लोणारमधील प्राचीन वारसा धोक्यात
किशोर मापारी
लोणार - जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवरातील हजारो वर्षापासून अखंड वाहत असलेला स्वच्छ व शुद्ध गोड पाणी असलेला रामगया झरा गेल्या नऊ वर्षापासून आटला असतानाच आता अखंड वाहत असलेले पापहरेश्वर तीर्थ ही जवळपास चार वर्षापासून आटले आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिराश होत आहे. त्यातच वाढते तापमान व भुजलाची घटलेली पातळी पाहता गोमुख धारेचा प्रवाहही कमी झाला आहे. दरम्यान, पापहरेश्वर येथे अस्थी विसर्जनासाठी येणारे नागरिकही आता येत नसल्याचे चित्र आहे.
शासकीय विश्राम गृहापासून सरोवरात पायऱ्यांनी खाली उतरल्यानंतर सुरुवातीलाच हेमाडपंती पश्चिम मुखी रामगया मंदिर दिसते. तीनद्वार असलेल्या या मंदिरात रामाची मूर्ती असून बाजूलाच श्रीरामेश्वर मंदिर आहे. या मंदिराच्या समोरच रामकुंड बुजलेल्या स्थितीत दिसून येतो. थोडे खाली उतरल्यानंतर नऊ वर्षापूर्वी अखंड वाहणारा स्वच्छ व शुद्ध पाण्याचा रामगया नावाने प्रसिद्ध असलेला झरा आटलेल्या स्थितीत आहे. जागतिक पर्यटन स्थळ लोणार सरोवर पाहण्यासाठी येणारे देश-विदेशातील पर्यटक तसेच अनेक शैक्षणिक सहली निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आल्यानंतर याच मार्गाने सरोवर पाहण्यासाठी उतरत होते.
एकेकाळी हजारो पर्यटकांची तहान भागवणारा रामगया झरा आज मात्र स्वत: च पाण्याच्या प्रतिक्षेत व्याकुळलेला आहे. निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येणारे हजारो पर्यटक रामगया मंदिर परिसरात थांबत होते. झऱ्यातील पाणी गोड असल्याने याच ठिकाणी पर्यटक जेवण घेऊन विश्रांती करत असत. विद्यार्थी सुद्धा या झºयातील पाण्याचा स्वाद घेऊन तहान भागवत व सहलीचा आनंद घेत. परंतु अनेकांची तहान भागवणारा रामगया झराच गेल्या नऊ वर्षापासून व्याकुळलेला दिसून येत आहे.
झऱ्याचे पाणी कधी प्रवाहीत होणार?
रामगया झऱ्याच्या पाठोपाठ गेल्या चार वर्षापासून पापहरेश्वर धार ही आटलेली आहे. राज्यभरातून अनेक भाविक अस्थी विसर्जन करण्यासाठी येथे येत होते. त्यानंतर याच ठिकाणी अनेक धार्मिक विधी केल्या जात होते. ह्या धारेच्या पाण्याची ही चव गोड होती. अखंड वाहणाऱ्या पापहरेश्वर धारतीर्थ गेल्या चार वर्षापासून आटलेले आहे; पण याबाबतीत प्रशासन मात्र उदासीन भूमिका घेत असून आज पर्यंत पाण्याचे झरे पुन्हा प्रवाहीत व्हावेत या दृष्टीने कुठलेही प्रयत्न झालेले दिसत नाहीत.
दिवसेंदिवस भूजलाची पातळी घटत चाललेली आहे. यामुळे झरे आटल्याचा अंदाज आहे.
- एच. बी. हुकरे, वरिष्ठ संरक्षण सहाय्यक, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, लोणार उपमंडळ.