वाद साेडवण्यासाठी गेलेल्या एकाची हत्या; भुमराळा दरी येथील घटना, 5 जणांना अटक

By संदीप वानखेडे | Updated: March 24, 2023 18:47 IST2023-03-24T18:46:43+5:302023-03-24T18:47:03+5:30

वाद साेडवण्यासाठी गेलेल्या एकाची हत्या करण्यात आली. 

 One who went to settle the dispute was killed  | वाद साेडवण्यासाठी गेलेल्या एकाची हत्या; भुमराळा दरी येथील घटना, 5 जणांना अटक

वाद साेडवण्यासाठी गेलेल्या एकाची हत्या; भुमराळा दरी येथील घटना, 5 जणांना अटक

लाेणार (बुलढाणा) : वाद साेडवण्यासाठी गेलेल्या एकाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून हत्या केल्याची घटना २३ मार्च राेजी दुपारी १ वाजता लाेणार तालुक्यातील भुमराळा दरी येथे घडली. भानुदास रोहिदास चव्हाण (वय ५०, रा. भुमराळा दरी) असे मृतकाचे नाव आहे. या प्रकरणी बिबी पाेलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

लाेणार तालुक्यातील भुमराळा दरी येथील गणेश चव्हाण यांच्या घरी नितीन अशोक कहाळे, सीमा नितीन कहाळे दोन्ही रा. रूमना तालुका सिंदखेड राजा व दिलीप यशवंत काळे, मंगल दिलीप काळे, भरत दिलीप काळे रा. शेवली तालुका मंठा जिल्हा जालना हे आले. त्यांनी चव्हाण यांच्याबराेबर वाद घालून मारहाण सुरू केली. यावेळी भानुदास चव्हाण यांनी मध्यस्थी करून मारहाण करणाऱ्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पाचही जणांनी भानुदास चव्हाण यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. 

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चव्हाण यांना बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डाॅक्टरांनी त्यांना मृत घाेषित केले. या प्रकरणी प्रयागबाई भानुदास चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिबी पाेलिसांनी पाचही आराेपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. आराेपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास उपविभागीय पाेलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात बिबी पोलिस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे करीत आहेत.


 

Web Title:  One who went to settle the dispute was killed