गच्चीवरून पडल्याने इसमाचा मृत्यू
By अनिल गवई | Updated: June 1, 2024 15:51 IST2024-06-01T15:51:38+5:302024-06-01T15:51:54+5:30
शनिवारी पहाटे दाळ फैलात घडली घटना

गच्चीवरून पडल्याने इसमाचा मृत्यू
अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव: घराच्या गच्चीवर झोपलेल्या एका ४८ वर्षीय इसमाचा गच्चीवरून पडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी पहाटे स्थानिक दाळ फैलात घडली.
प्राप्त माहितीनुसार, विजय दशरथ बावणे असे मृतक इसमाचे नाव आहे. गच्चीवरून पडल्याने या इसमाला शनिवारी पहाटे सामान्य रूग्णालयात मृतावस्थेत दाखल करण्यात आले. याप्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. क्षीरसागर यांच्यावतीने कक्षसेवक आशुतोष गजानन देशमुख यांनी दिलेल्या माहितीवरून शिवाजी नगर पोलीसांनी मृतक इसमाच्या मृत्यूप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घराच्या गच्चीवर झाेपलेला असताना लघू शंकेसाठी उठल्यानंतर या इसमाचा पाय घसरून अपघात झाल्याची माहिती सामान्य रूग्णालयाती सुत्रांनी दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास शिवाजी नगर पोलीस करीत आहेत. या घटनेमुळे दाळ फैलात एकच खळबळ उडाली आहे.