सासरच्यांनी नाकारलेल्या ‘लक्ष्मी’ने काढली चक्क बसस्थानकावर लक्ष्मीपूजनाची रात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 07:37 AM2021-11-10T07:37:55+5:302021-11-10T07:38:20+5:30

नवविवाहितेचा पहिला दिवाळ सण अंधारात

Lakshmi, who was rejected by her father-in-law, spent the night of Lakshmi Puja at the bus stand | सासरच्यांनी नाकारलेल्या ‘लक्ष्मी’ने काढली चक्क बसस्थानकावर लक्ष्मीपूजनाची रात्र

सासरच्यांनी नाकारलेल्या ‘लक्ष्मी’ने काढली चक्क बसस्थानकावर लक्ष्मीपूजनाची रात्र

Next

- अनिल गवई

खामगाव (जि. बुलडाणा) : अंतर्गत कलहामुळे गत साडेचार महिन्यांपासून माहेरी आलेली एक विवाहिता सर्व मतभेद विसरून सासरी आली. सणासुदीत सर्वकाही सुरळीत होईल या अपेक्षेने माहेरचा रोष ओढवून सासरी आलेल्या त्या विवाहितेला ऐन दीपावलीच्या दिवशी गृहप्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे पदरी निराशा आलेल्या विवाहितेला लक्ष्मीपूजनाची रात्र चक्क खामगाव बसस्थानकावर काढावी लागली. 

अकोला येथील हरिहरपेठ माहेर असलेल्या एका विवाहितेचा सासरच्यांशी गत साडेचार महिन्यांपासून वाद आहे. सासरी शारीरिक व मानसिक छळ होत असल्याने साडेचार महिन्यांपासून ती माहेरीच राहते. मध्यस्थांमार्फत तोडगाही काढण्यात आला. पहिला दिवाळसण असल्यामुळे ती शिवाजीनगर पोलीस स्टेशनअंतर्गत घाटपुरी नाका परिसरातील सासरी पोहोचली. मात्र, तिथे सासू-सासऱ्यांसह पतीनेही मागील वाद उकरून काढत  विवाहितेला ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तिला गृहप्रवेश नाकारला.

घरच्यांनी प्रवेश नाकारल्यानंतर ती विवाहिता सुरुवातीला पोलीस स्टेशनमध्ये गेली. तिथे अपेक्षित न्याय न मिळाल्याने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे गेली. मात्र, मर्यादा स्पष्ट झाल्यानंतर एकटीच बसस्थानकावर थांबली. ही बाब माहेरी माहिती पडल्यानंतर उत्तररात्री नात्यातील एक मावशी नवविवाहितेच्या मदतीला धावली.

‘एसडीपीओ’कडूनही निराशाच पदरी

शिवाजीनगर पोलिसांनी योग्य ते सहकार्य न केल्याचे सांगत पीडित विवाहिता उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे पोहोचली. मात्र, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांकडे विचारणा केली. तक्रार दाखल नसल्यामुळे शिवाजीनगर पोलिसांनी आपल्या मर्यादा स्पष्ट केल्या. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून संबंधित विवाहितेची समजूत काढण्यात आली.

पोलीस आणि भावानेही सोडली साथ

विवाहितेला सासरी तिच्या दारापर्यंत भावाने आणून सोडले. सासरचे घरात घेत नसल्याचे समजताच बहिणीसोबत तो शिवाजीनगर पोलीस स्टेशनपर्यंत गेला. दोन्ही भावंडांनी पोलिसांकडे आपबीती कथन केली. पोलीस संरक्षणात बहिणीला तिच्या सासरी सोडण्याची विनंती केली. पोलिसांनी त्यांचे गाऱ्हाणे ऐकून घेतले; परंतु विवाहितेला घरी सोडण्यासाठी असमर्थता दर्शविली. पोलिसांचे म्हणणे ऐकल्यानंतर भाऊदेखील माघारी परतला. त्यानंतर पुन्हा विवाहिता एकटीच तिच्या सासरी गेली. मात्र, परत तिला प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर ती बसस्थानकावर पोहोचली. 
 

Web Title: Lakshmi, who was rejected by her father-in-law, spent the night of Lakshmi Puja at the bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.