जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 22:20 IST2025-08-17T22:18:49+5:302025-08-17T22:20:10+5:30

रविवारी सकाळपासून १५ किमी सर्च ऑपरेशन राबवले. त्यावेळी धुपेश्वर मंदिराजवळ सायंकाळी ७ च्या सुमारास मृतदेह सापडला असं रेस्क्यू टीममधील स्वयंसेवकाने माहिती दिली. 

In Buldhana, the body of protester vinod pawar who jumped into the purna river during the Jalsamadhi protest was found 15 km away | जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला

बुलढाणा - जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द गावच्या नागरी समस्या घेऊन स्वातंत्र्यदिनी जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी विनोद पवार नावाच्या आंदोलनकर्त्याने सरकारचा निषेध करत पूर्णा नदीत उडी मारली. गेल्या २ दिवसापासून प्रशासनाकडून या आंदोलनकर्त्याचा शोध सुरू होता. अखेर रविवारी १७ ऑगस्टला संध्याकाळी ७ च्या सुमारास विनोद पवार यांचा मृतदेह सापडला आहे. 

या घटनेवर जळगाव जामोदचे तहसिलदार पवन पाटील म्हणाले की, १५ ऑगस्ट रोजी जिगाव प्रकल्पाविरोधात काही गावकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यापैकी विनोद पवार या आंदोलकाने जलसमाधी घेतली होती. पूर्णा नदी पात्रात त्यांनी उडी घेतली. त्यानंतर जिल्हा पोलीस यंत्रणा, महसूल यंत्रणा, आरोग्य पथक आणि NDRF टीमकडून त्यांचा शोध घेतला जात होता. मात्र शनिवारी दिवसभर काहीच पत्ता लागला नाही. रात्री अंधार झाल्यानंतर सर्च ऑपरेशन थांबवण्यात आले. त्यानंतर रविवारी सकाळी ६ वाजल्यापासून पूर्ण यंत्रणा पुन्हा शोध मोहिमेला लागली. संध्याकाळी ७ च्या सुमारास धुपेश्वरजवळ विनोद पवार यांचा मृतदेह सापडला. मलकापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात पोस्टमोर्टमनंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितले. 

तर जिगाव प्रकल्पग्रस्त आंदोलनावेळी एक आंदोलनकर्ते पूर्णा नदी पात्रात बुडाल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानंतर तात्काळ सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. १५ ऑगस्टला दुपारी १२ वाजता रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहचली. त्यावेळी पाण्याचा प्रवाह खूप मोठा होता. त्यात रेस्क्यू टीमने सर्च ऑपरेशन सुरू केले. शनिवारी दिवसभरात काही हाती लागले नाही. रविवारी सकाळपासून १५ किमी सर्च ऑपरेशन राबवले. त्यावेळी धुपेश्वर मंदिराजवळ सायंकाळी ७ च्या सुमारास मृतदेह सापडला असं रेस्क्यू टीममधील स्वयंसेवकाने माहिती दिली. 

काय आहे प्रकरण?

जिगाव प्रकल्पातील आडोळ खुर्द हे पहिल्या टप्प्यातील गाव आहे. परंतु प्रशासनाने या गावाकडे पूर्णतः दुर्लक्ष केलेले आहे. २०१६ साली आडोळ खुर्द गावाला अतिशय कमी स्वरूपात घरांचा मोबदला देण्यात आला. त्यानंतर एक ते दोन वर्षात नवीन गावठाणात प्लॉट देणे आवश्यक होते. परंतु संबंधित खात्याच्या हलगर्जीपणामुळे २०२३ मध्ये येथील नागरिकांना प्लॉट वाटप झाली. एकाच प्रकल्पातील इतर गावांना वेगळा न्याय व आडोळ खुर्द गावाला वेगळा न्याय कशासाठी हा प्रश्न गावकरी विचारात होते. वारंवार प्रशासनाकडे दाद मागूनही न्याय मिळत नसल्याने गावकऱ्यांनी अखेर १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी मुलं बाळांसकट हे गावकऱ्यांनी जिगाव प्रकल्पाच्या पूर्णा नदी पात्रात जलसमाधी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी विनोद पवार यांनी पूर्णा नदीत उडी मारली. 
 

Web Title: In Buldhana, the body of protester vinod pawar who jumped into the purna river during the Jalsamadhi protest was found 15 km away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.