मुल्यवर्धन कार्यक्रमाचा मुख्याध्यापकांनाच विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 15:22 IST2019-09-10T15:22:35+5:302019-09-10T15:22:54+5:30
खामगाव तालुक्यासह जिल्हयातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले.

मुल्यवर्धन कार्यक्रमाचा मुख्याध्यापकांनाच विसर
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: जिल्ह्यातील नगर परिषद व जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बुध्दयांक नाहीतर भावनिक बुध्द्यांक सुद्धा वृद्धींगत व्हावा यासाठी १ सप्टेंबरपासून मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र अद्याप खामगाव तालुक्यासह जिल्हयातील अनेक शाळांमध्ये या उपक्रमाबाबत मुख्याध्यापक अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. यामुळे शासनाच्या अभिनव उपक्रमाला हरताळ फासल्याचे दिसून येते.
राज्यातील ४० हजार प्राथमिक शाळांमध्ये मुल्यवर्धन कार्यक्रम राबविण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. १ सप्टेबर पासून या उपक्रमाची अंमलबजावणी होणे अपेक्षित होते. मात्र शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांपर्यंत पोहचले नाहीत. यामुळे मुख्याध्यापकांना मुल्यवर्धन कार्यक्रमाचा विसर पडला आहे.विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनात घटनात्मक मुल्ये रूजावीत, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.
दृष्टीक्षेपात मुल्यवर्धन कार्यक्रम
विद्यार्थ्यांमधील रचनावादी दृष्टीकोण विकसीत करण्यावर भर देण्यात येत असून यामध्ये पालक आणि शिक्षकांचा अधिकाधिक समावेश यात करण्यात आला आहे. शांतीलाल मुथ्था फाऊंडेशनने प्राथमिक शिक्षकांना मुल्यवर्धन कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले आहे. तरीसुद्धा हा उपक्रम अद्याप जिल्हयात राबविण्यास सुरवात झाली नसल्याचे दिसून येत आहे.
भावनिक बुध्द्यांक वाढवण्यावर भर
विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देत असतांना विद्यार्थ्यांचा फक्त बुध्द्यांक नाही तर भावनिक बुध्द्यांक वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यातील ३६ जिल्हयात २१५ तालुक्यातील ४० हजार २३१ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मुल्यवर्धन कार्यक्रमाची माहिती तालुक्यातील सर्व नगरपरिषद व जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांना दिली आहे. ज्या ठिकाणी उपक्रम राबविणे सुरु झाले नसेल अशा मुख्याध्यापकांना उपक्रम राबविण्यासंदर्भात आदेशीत करण्यात येईल.
- गजानन गायकवाड,
गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, खामगाव.