बुलढाणा : शहरानजीक असलेल्या हनवतखेडच्या जंगलात अचानक आग लागल्याची घटना रविवारी रात्री दरम्यान घडली. वन विभागाच्या सतर्कतेमुळे मात्र वेळीच आगीवर नियंत्रण मिळवता आले.
बुलढाणा शहरालगत मोठी वनसंपदा आहे. परंतु या भागात वनवा लागण्याचे प्रमाण गत काही दिवसांपासून वाढत आहे. शहराला लागून असलेल्या हनवतखेडच्या जंगलात रविवारच्या रात्री अचानक आग लागली. या वणव्यामध्ये अमूल्य अशी वनसंपदा नष्ट होत असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. दरम्यान, वन विभागाच्या टीमने तातडीने घटनास्थळ गाठून या आगीवर नियंत्रण मिळविले.
ही आग आपोआप लागली की कोणी लावली? हे अद्याप कळू शकलेले नाही. या परिसरात वन्य प्राण्यांसह विविध प्रजातींची वनसंपदा आहे. बुलढाणा वन विभागाच्या पथकाने वेळीच आग विझविण्यासाठी घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला, अशी माहिती बुलढाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांनी दिली आहे.