स्मार्ट सिटीला देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध

By ब्रह्मानंद जाधव | Published: July 29, 2023 03:45 PM2023-07-29T15:45:21+5:302023-07-29T15:48:01+5:30

केंद्र शासनाचा समृद्धी महामार्गालगत स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा प्रकल्प आहे.

Farmers of Deulgaon Raja Taluka oppose Smart City | स्मार्ट सिटीला देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध

स्मार्ट सिटीला देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा विरोध

googlenewsNext

देऊळगाव राजा : समृद्धी महामार्गालगत होणाऱ्या स्मार्ट सिटीला तालुक्यातील गोळेगावसह परिसरातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. प्रस्तावित स्मार्ट सिटी प्रकल्प रद्द करावा, आमच्या उत्पन्नाचे साधन असलेली शेतजमीन हिरावून घेऊ नये, अशी मागणीच तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केली आहे.

केंद्र शासनाचा समृद्धी महामार्गालगत स्मार्ट सिटी निर्माण करण्याचा प्रकल्प आहे. तालुक्यातील गोळेगाव, निमखेड, सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव तीनही गावातील शेतकऱ्यांच्या हजारो एकर शेत जमिनीवर स्मार्ट सिटीची निर्मिती प्रस्तावित करण्यात आली आहे. गोळेगाव येथील शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी सिंदखेड राजा यांना निवेदन दिले आहे. या भागातील नागरिकांचा उदरनिर्वाह हा शेतीवरच अवलंबून आहे.

परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी हे अल्पभूधारक असून त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या जमिनीमध्ये पिके घेऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि उपजीविका करतात. त्याचबरोबर मुलांचे पालन पोषण, शिक्षण हे केवळ शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे शासनाने प्रस्तावित केलेली नवनगर स्मार्ट सिटी रद्द करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकाऱ्यांना सर्व शेतकऱ्यांनी पत्र दिले आहे. यावर वसंत कोल्हे, दिगंबर कोल्हे, जनार्दन कोल्हे, विठ्ठल कोल्हे, सदाशिव कोल्हे, रामेश्वर कोल्हे, राजेंद्र कोल्हे, भास्कर कोल्हे, आबासाहेब कोल्हे, इंदुबाई कोल्हे, सोपान कोल्हे, मच्छिंद्र कोल्हे, विठ्ठल कोल्हे, लक्ष्मण कोल्हे, बाबासाहेब कोल्हे, रवींद्र एडके, संपत कोल्हे अशा एकूण १८४ शेतकऱ्यांनी सह्या केल्या आहेत.

शासनाच्या अटी अमान्य, शेतकऱ्यांचा निर्णय

स्मार्ट सिटीसाठी अधिग्रहित करण्यात येणाऱ्या शेतजमिनी या समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर अधिग्रहीत करण्यात येणार नसून शेतकऱ्यांना दहा वर्ष पिकांचा मोबदला देण्यात येणार आहे. दहा वर्षानंतर अधिग्रहित जमिनीपैकी ३० टक्के एन ए (अकृषक) जमीन परत देण्यात येणार आहे. शासनाच्या या अटी शेतकऱ्यांना अमान्य असल्याचा निर्णय देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी घेतला आहे.

Web Title: Farmers of Deulgaon Raja Taluka oppose Smart City

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.