विम्यासाठी खर्च २,४४३ रु., कंपनीची भरपाई २,४७६ रु. हाती उरले ३३ रु.
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 10:50 IST2022-11-26T10:49:13+5:302022-11-26T10:50:28+5:30
राज्यात वैयक्तिक नुकसानीच्या पीक विम्यापोटी मंजूर झालेल्या नुकसानभरपाईची एकूण रक्कम २,१४८ कोटी आहे. या रकमेपैकी फक्त ९४२ कोटी रुपये भरपाईचे वाटप झाले.

विम्यासाठी खर्च २,४४३ रु., कंपनीची भरपाई २,४७६ रु. हाती उरले ३३ रु.
बुलढाणा : पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरू असून, विम्याची रक्कम व खर्च वजा जाता चिखली तालुक्यातील शेतकऱ्याला केवळ ३३ रुपये शिल्लक उरले.
चिखली तालुक्यातील काेलारा येथील गजानन साेळंकी यांनी पाच एकरातील साेयाबीनचा विमा काढला हाेता. त्यांना २ हजार १०९ रुपये हप्ता आला. विमा काढण्यासाठी सीएससी केद्र संचालकाने १०० रुपये घेतले. सातबारा काढण्यासाठी ३० रुपये व झेराॅक्ससाठी ४ रुपये खर्च आला. सर्व्हेसाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधीने २०० रुपये घेतले. विमा कंपनीने साेळंकी यांच्या खात्यात पीक नुकसानीची भरपाई म्हणून २५ नाेव्हेंबर राेजी २ हजार ४७६ रुपये जमा केले. साेळंकी यांनी केलेला खर्च वजा करता त्यांच्या हाती केवळ ३७ रुपये उरले.
खरीप हंगामात पाच एकर साेयाबीनचा विमा काढला हाेता. विम्याचा हप्ता, ऑनलाइन अर्ज आणि इतर खर्च असा २,४४३ रुपये खर्च झाला. मला शुक्रवारी कंपनीच्या वतीने २,४७६ रुपये मिळाले. खर्च वजा करता केवळ ३३ रुपये भरपाई मिळाली आहे़ - गजानन साेळंकी, शेतकरी
पीक विम्यासाठी मनसेचे खळ्ळखट्याक -
- लातूर - खरीप हंगामातील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, विमा कंपन्यांकडून स्वतःच्या नफेखोरीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीच्या प्रमाणात विमा देत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लातूर येथील पीक विमा कार्यालयासमोर खळ्ळखट्याक आंदोलन केले.
- राज्यात वैयक्तिक नुकसानीच्या पीक विम्यापोटी मंजूर झालेल्या नुकसानभरपाईची एकूण रक्कम २,१४८ कोटी आहे. या रकमेपैकी फक्त ९४२ कोटी रुपये भरपाईचे वाटप झाले. नुकसान कमी झाले आहे, असे दाखवून मंजूर नुकसानभरपाई दिलेली नाही. त्यामुळे मनसैनिकांनी शुक्रवारी पीक विमा कार्यालयासमोर आंदोलन केले.