घारोड येथे नाल्याच्या पुलावरून वृद्ध वाहून गेला, पुतण्या पोहता येत असल्याने बचावला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 13:37 IST2025-05-28T13:35:00+5:302025-05-28T13:37:20+5:30
ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली.

छायाचित्र: नदीपात्रात इंगळे यांचा शोध घेताना पोलीस पथक आणि ग्रामस्थ.
खामगाव: तालुक्यातील घारोड (ता. खामगाव) येथील धोंडूजी भगवान इंगळे ( ७०) हे आपला पुतण्या राहुल मधुकर इंगळे याच्यासोबत शेतावरून मोटारसायकलवरून घरी येत असताना घारोड अकोली मार्गावरील नाल्याच्या पुलावरून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. ही घटना मंगळवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार, पुराच्या पाण्याचा जोर अधिक असल्याने मोटारसायकल वरील नियंत्रण सुटले आणि दोघेही पाण्यात पडले. यावेळी राहुल इंगळे यास पोहता येत असल्याने त्याने कसाबसा जीव वाचवला. मात्र, धोंडूजी इंगळे यांना पोहता येत नसल्याने ते वाहून गेले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांसह हिवरखेड पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम सुरू केली आहे. घटनास्थळी मोटारसायकल आणि इंगळे यांचे धोतर सापडले आहे, मात्र अद्यापपर्यंत त्यांचा मृतदेह सापडलेला नाही. अतिवृष्टीमुळे नाल्यांना आलेल्या पुराचा अंदाज न घेता वाहतुकीचा प्रयत्न केल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाने अशा परिस्थितीत पुलांवरील वाहतूक टाळण्याचे आवाहन केले आहे.
शोधमोहीमेसाठी प्रशासन सतर्क; एसडीआरएफ विभागाला कळवले
या घटनेची माहिती खामगावचे तहसीलदार सुनील पाटील तसेच बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयातील एसडीआरएफ विभागाचे संभाजी पवार यांना कळविण्यात आली आहे. स्थानिक पातळीवर हिवरखेड पोलिस ठाण्याचे पीआय चौधरी, तलाठी आणि गाव प्रशासनाच्या वतीने शोधमोहीम सुरू आहे. पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या धोंडूजी इंगळे यांचा तपास घेण्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक ती कार्यवाही तात्काळ राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत.
इंगळे यांच्या घरी शोककळा; ग्रामस्थांकडून शोधकार्याला हातभार -
धोंडूजी इंगळे यांच्या घरात रात्रीपासूनच शोककळा पसरली आहे. त्यांच्या कुटुंबियांची अवस्था अत्यंत वेदनादायक असून, गावकऱ्यांनी देखील शोधकार्याला सक्रिय पाठिंबा दिला आहे. नदीकाठ, झाडी, व नाल्याच्या परिसरात ग्रामस्थ व प्रशासन मिळून सतत शोध घेत आहेत.