कडक निर्बंधांमुळे 'वीक एण्ड'ला रस्त्यावर शुकशुकाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 11:27 AM2021-04-11T11:27:05+5:302021-04-11T11:27:17+5:30

Lockdown in Buldhana : शनिवार व रविवारी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला.

Due to strict restrictions, 'Weekend' is on the streets! | कडक निर्बंधांमुळे 'वीक एण्ड'ला रस्त्यावर शुकशुकाट!

कडक निर्बंधांमुळे 'वीक एण्ड'ला रस्त्यावर शुकशुकाट!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा :  कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यात शनिवार व रविवारी लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळाला. ५ ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू केल्याने व्यापाऱ्यांमधून या लाॅकडाऊनला विरोध दर्शविण्यात येत आहे; मात्र, शनिवारी अनेकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. 
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी ६ एप्रिल रोजी सुधारित आदेश लागू केले होते. या आदेशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्यात येत आहेत. शनिवार व रविवार कडक निर्बंध असल्याने शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट दिसून आला; परंतु सकाळी ११ पर्यंत काही ठिकाणी नागरिकांची गर्दी होती. दरम्यान, पोलिसांनी विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना तंबी दिली. त्यामुळे दुपारनंतर अनेक रस्त्यावरील गर्दी कमी झाली होती. सर्व दुकाने बंद दिसून आली. बुलडाणा शहरात दिवसभर रस्ते निर्मनुष्य झाले होते. क्वचितप्रसंगी दुचाकीवर एखाद दोन व्यक्ती जाताना दिसत होत्या. अशीच स्थिती मेहकर, चिखली, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, मोताळा, खागाव, मलकापूर, शेगाव, नांदुरा शहरांमध्ये होती. 


प्रवास करण्यास मुभा
शनिवार व रविवारी संचारबंदीच्या काळात रेल्वे, बस यातून प्रवास  करून आगमन होणाऱ्या प्रवाशांनी अधिकृत तिकीट बाळगावे. जेणेकरून त्यांना निर्बंधांच्या काळात स्थानकापर्यंत किंवा त्यांच्या घरापर्यंत जाणे सोयीचे होईल, असे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. औद्योगिक कामगारांना कामाच्या शिफ्टनुसार कामाचे ठिकाणी जाण्या-येण्यासाठी त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री आठ ते सकाळी सात या वेळेत अथवा शनिवार, रविवार निर्बंधांच्या काळात, खासगी बस, वाहनाने प्रवास करण्यास मुभा आहे. 


नियम मोडणाऱ्यांवर जिल्हाधिकाऱ्यांनी केली कारवाई
बुलडाणा :  जिल्ह्यात शासनाने लागू केलेल्या कोरोना संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन होत आहे किंवा नाही, जीवनाश्वयक वस्तू वगळता अन्य दुकाने बंद ठेवण्याचा आदेश असतानाही दुकाने बंद आहेत की सुरू, याबाबत पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती स्वत: बुलडाणा शहरात रस्त्यावर उतरले. निर्बंधांचे आदेश मोडणाऱ्या काही दुकानांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई केली. त्यांना नियमानुसार दंड ठोठावला. कारवाई करताना जिल्हाधिकाऱ्यांनी कोरोना संसर्गापासून स्वत: चे व कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंग पाळावे व हात वारंवार धुवावेत किंवा सॅनिटाईज करावेत, शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

Web Title: Due to strict restrictions, 'Weekend' is on the streets!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.