Due to the flood, the road was shaky; Traffic jam on Aurangabad-Nagpur highway | पुरामुळे रस्ता खरडून गेला; औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प
पुरामुळे रस्ता खरडून गेला; औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक ठप्प

बुलडाणा: सुलतानपूर ते मेहकर रोडवरील सितानाहनी नदीवरील पुलाजवळ पुरामुळे रस्ता खरडून गेला आहे. त्यामुळे औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील वाहतूक शनिवारी सकाळी आठ वाजेपासून ठप्प झाली आहे. मेहकर नजीक रस्त्याच्या दोन्ही बाजूस १० कि.मी. पर्यंत वाहनाच्या रांगा लागल्या आहेत.
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून परतीचा पाऊस सुरू आहे. सर्वसाधारण पर्जन्यमानाच्या तुलनेत ११७.५३ टक्के पाऊस झाला आहे. मेहकर तालुक्यात शुक्रवारीपासून सततधार पाऊस सुरू आहे. रात्रभर पावसाने हजेरी लावल्याने अनेक नद्यांना पूर आला. सुलतानपूर ते मेहकर रोडवरील नदी सुद्धा तुडूंब भरली आहे. या पुरामुळे नदीवरील पुलानजीकचा रस्ता खरडून गेला आहे. काही दिवसांपासून सुलतानपूर ते मेहकर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यात पावसाने या रस्त्याची अवस्था अधिकच बिकट झाली आहे.  पुरामुळे रस्ता खरडून गेल्याने नागपूर-औरंगाबाद या महामार्गावरील मेहकरनजीकची वाहतूक प्रभावीत झाली आहे. हा रस्ता वर्दळीचा असल्याने काही तासातच वाहनांच्या रांगा लागल्या. शनिवारी सकाळी आठ वाजेपासून वाहतूक ठप्प झाल्याने १० कि़मी. पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सध्या पावसाचा जोर कमी झालेला नाही. त्यामुळे पूर परिस्थतीचा धोका वाढतच आहे. 


पैनगंगा नदीला पूरपरिस्थिती
अंत्री देशमुख नजीक पैनगंगा नदीलाही सततच्या होत असलेल्या पावसामुळे  पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतकºयांच्या शेतात पाणी घुसल्याने सोयाबीनच्या सुड्या वाहून गेल्याचा प्रकार समोर आला आहे. आज सकाळपासून पैनगंगा नदीचा प्रवाह वाढला आहे. पुरामुळे पिकाचे नुकसान होण्यासोबतच शेतजमिनी सुद्धा खरडून गेल्या आहेत. त्यामुळे पिकांसाठी असणारा पोत पाण्यासोबत वाहून गेला आहे. हे कधीही न भरून निघणारे नुकसान आहे. त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वाढली आहे. 


कोराडी प्रकल्प ओव्हर फ्लो
मेहकर तालुक्यातील कोराडी प्रकल्प १०० टक्के भरलेला आहे.  सध्या पावसाचा जोर वाढतच आहे. ओव्हर फ्लो झालेल्या कोराडी प्रकल्पाने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परिसरातील शेतकºयांची धाकधुक वाढली आहे.

Web Title: Due to the flood, the road was shaky; Traffic jam on Aurangabad-Nagpur highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.