नाफेडच्या अधिका-यांना काँग्रेसचा घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2017 02:07 IST2017-03-12T02:07:51+5:302017-03-12T02:07:51+5:30

चिखली येथे काँग्रेसचे आंदोलन.

Congress encircles Nafed officials | नाफेडच्या अधिका-यांना काँग्रेसचा घेराव

नाफेडच्या अधिका-यांना काँग्रेसचा घेराव

चिखली, दि. ११- येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावर पुरेसा बारदाना देण्यात यावा, तसेच खरेदी सुरळीतपणे सुरू ठेवावी, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने नाफेडच्या अधिकार्‍यांना ११ मार्च रोजी घेराव घालण्यात आला होता. येथील नाफेडच्या तूर खरेदी केंद्रावर नाफेडचे एस.के. कक्कर व जिल्हा मार्केटिंग अधिकारी पी.एस. शिंगणे यांनी भेट दिली असता बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णू पाटील व कार्यकर्त्यांंनी अधिकार्‍यांस घेराव घातला होता. दरम्यान, डॉ. भुसारी यांनी सद्यस्थितीत या खरेदी केंद्रावर २७ हजार क्विंटल तूर खरेदी अभावी पडून असल्याने त्याची खरेदी करून घेत शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तातडीने बारदाना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी केली. १५ दिवसांपासून खरेदी बंद असल्याने तालुकाध्यक्ष विष्णू पाटील यांनी याप्रकरणी प्रश्न उपस्थित करून नाफेड अधिकार्‍यांना घेराव घातला असता अधिकार्‍यांनी तातडीने अडीच हजार पोत्यांची व्यवस्था करून दिली. या खरेदीसाठी स्थानिक बारदानाही चालू शकतो का, या बाबत सकारात्मक विचार करू, अशी ग्वाही दिली. त्यामुळे हा घेराव मागे घेण्यात आला; मात्र या खरेदी केंद्रावर गेल्या १५ दिवसांपासून माल घेऊन आलेल्या त्रस्त शेतकर्‍यांनी आमचेच पोते घ्या , पण मालाचे मोजमाप करून आम्हाला मोकळे करा, अशी मागणी लावून धरली होती. तर शासनाची अपेक्षित खरेदी आटोपत आली असल्याने बारदानाही संपला आहे. नवीन बारदाना येण्यास त्यामुळे विलंब लागत आहे. महाराष्ट्रभर अशीच स्थिती असल्याने १५ मार्चला तूर खरेदी बंद होणार का, खरेदी केंद्रावर आलेली संपूर्ण तूर घेतली जाणार का, राज्य सरकार यामध्ये मध्यस्थी करेल का, असे अनेक प्रश्न यावेळी शेतकर्‍यांनी उपस्थित केले होते.

Web Title: Congress encircles Nafed officials