बुलढाणा हादरले ! रुपाली झोपेत असतानाच राहुलने कुऱ्हाडीने घातले घाव, चार वर्षाच्या मुलाचाही घेतला जीव; असं का घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 14:48 IST2025-12-30T14:39:33+5:302025-12-30T14:48:33+5:30
Buldhana : मेहकरमध्ये कौटुंबिक कलहाचा कळस; महिला व चिमुकल्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार

Buldhana was shaken! Rahul stabbed Rupali with an axe while she was sleeping, also took the life of a four-year-old child; Why did this happen?
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर (जि. बुलढाणा) : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने झोपेत असलेल्या पत्नीचा, तसेच अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा कुन्हाडीचे घाव घालून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी उत्तररात्री सुमारे दोनच्या सुमारास मेहकर शहरातील प्रभाग क्रमांक १ येथील शिक्षक कॉलनीत घडली. या घटनेत रूपाली राहुल म्हस्के (वय ३०) व तिचा चार वर्षीय मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी आरोपी पती राहुल हरी म्हस्के (वय ३५) याच्याविरुद्ध मेहकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत रूपालीचे वडील भास्कर शंकर वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.
राहुल म्हस्के, त्याची पत्नी रूपाली, मुलगा रियांश, वडील हरी गोविंद म्हस्के, आई ताराबाई हरी म्हस्के व आजी, असे सहा जण एकाच घरात वास्तव्यास होते. रविवारी रात्री सर्व जण गाढ झोपेत असताना पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या राहुलने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलून झोपेत असलेल्या रूपाली व रियांश यांच्या डोक्यावर घाव घातले.
आरडाओरड झाल्याने आरोपीची आई ताराबाई म्हस्के यांना जाग आली. त्यांनी बाहेर येत आरडाओरड केल्यावर समोरच राहणारे संजय समाधान कळसकर यांच्यासह शेजारील नागरिकांनी तत्काळ धाव घेतली. गंभीर जखमी अवस्थेतील रूपाली यांना प्रथम मेहकर येथील रुग्णालयात, त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. सोमवारी सकाळी अपर पोलिस अधीक्षक लोढा यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपी राहुल म्हस्के याला ताब्यात घेण्यात आले असून, घटनेमागील मानसिक स्थिती व संशयाची पार्श्वभूमी तपासण्यात येत आहे.
आरोपीने मुलासह स्वतःला घरात कोंडून घेतले होते
घटनेनंतर आरोपी राहुल म्हस्के याने स्वतःला व मुलगा रियांशला घरातील आतील खोलीत कोंडून घेतले होते. संशय बळावल्यानंतर शेजाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा आग्रह धरला असता राहुलने दरवाजा उघडला.
रियांश गंभीर अवस्थेत आत पाहणी केली असता आढळून आला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
अवघ्या चार वर्षांच्या निष्पाप रियांशचा कौटुंबिक कलहातून बळी गेल्याने मेहकर शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.