Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भेटीसाठी कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी काढली रात्र जागून
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 10:33 IST2022-11-23T10:31:48+5:302022-11-23T10:33:05+5:30
Rahul Gandhi, Bharat Jodo Yatra: राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे आदिवासी बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत त्यांनी दिलेला धनुष्यबाण स्वीकारत त्यांच्यासोबत बसून संवाद साधला.

Bharat Jodo Yatra: राहुल गांधींच्या भेटीसाठी कडाक्याच्या थंडीत आदिवासींनी काढली रात्र जागून
- प्रा.नानासाहेब कांडलकर
जळगाव जामोद- खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुधवार दि.२३ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजता महाराष्ट्रातून मध्यप्रदेशकडे प्रयाण करणार असल्याने सातपुडा पर्वतराजित वसलेल्या भिंगारा,चाळीसटापरी व गोमाल या गावातील आदिवासी बांधव,महिला व मुले यांनी महाराष्ट्र व मध्यप्रदेशची सीमा असलेल्या तीनखूटी येथे कडाक्याच्या थंडीत अख्खी रात्र जागून काढली.बुधवारी सकाळी साडेसहा वाजता खा.राहुल गांधी तेथे पोहोचले त्यावेळी सर्व आदिवासी बांधवांनी भारत जोडोचा जयजयकार करत "हम भी आपके साथ है" असा संदेश दिला.
खा.राहुल गांधी यांनी अत्यंत नम्रपणे आदिवासी बांधवांच्या स्वागताचा स्वीकार करीत त्यांनी दिलेला धनुष्यबाण स्वीकारत त्यांच्यासोबत बसून संवाद साधला.विशेष म्हणजे यावेळी आदिवासी बांधवांनी राहुल गांधी यांच्याकडे कोणतीही मागणी केली नाही किंवा साधे निवेदन सुद्धा दिले नाही.आपकी भारत जोडो यात्रा से हम भी एक हो गये एकता का महत्व हमे भी समझा अशी भावना आदिवासींनी यावेळी व्यक्त केली. आदिवासींच्या आरोग्य,शिक्षण व रोजगार याबाबत असलेल्या समस्यांची जाण आपणास आहे या समस्या दूर करून आदिवासींना सन्मानाचे जीवन कसे जगता येईल यासाठी आपण प्रयत्नरत राहू असा विश्वास खा.राहुल गांधी यांनी आदिवासी बांधवांना यावेळी दिला.माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी आदिवासी बांधवांची भारत जोडो यात्रेप्रति असलेली निष्ठा व त्यांनी कडाक्याच्या थंडीत जागून काढलेली रात्र याविषयी राहुल गांधी यांना ज्ञात केले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले,माजी मंत्री बाळासाहेब थोरात व यशोमती ठाकूर,मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ, महाराष्ट्र प्रभारी एस.के.पाटील,आ.प्रणिती शिंदे, प्रदेश सचिव डॉ.स्वाती वाकेकर व रामविजय बुरंगले, प्रकाश पाटील,अविनाश उमरकर,अँड. अमर पाचपोर आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
"झुकना बंद करो" राहुल गांधी यांचा संदेश
तीन खुटी येथे आदिवासी बांधवांशी संवाद साधतांना दोन छोटी मुले राहुल गांधी यांच्या पाया पडत होती.राहुल गांधी यांनी त्यांना विरोध केला आणि म्हटले "झुकना बंद करो,मेरे पैर पडणे की कोई जरूरत नही,सन्मानसे जीओ" अशा प्रकारचा अत्यंत मोलाचा संदेश राहुल गांधी यांनी यावेळी सर्व आदिवासी बांधवांना दिला.