पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:42 IST2021-06-09T04:42:46+5:302021-06-09T04:42:46+5:30
येथे राष्ट्रीयीकृत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा असून, या शाखेअंतर्गत अंढेरा, सेवानगर, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे, पिप्री ...

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची अडवणूक
येथे राष्ट्रीयीकृत विदर्भ कोकण ग्रामीण बँकेची शाखा असून, या शाखेअंतर्गत अंढेरा, सेवानगर, मेंडगाव, बायगाव, शिवणी आरमाळ, सावखेड नागरे, पिप्री आंधळे ही गावे येतात. सध्या पेरणीचे दिवस आहेत. शेतकरी पेरणीसाठी बी-बियाणे, खते यासाठी पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. ५ जून २०२१ रोजी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनीसुद्धा खरीप हंगामात जास्तीत जास्त शेतकऱ्यांना तत्काळ पीक कर्ज वाटप करण्याचे आदेश दिले असून, पीक कर्जासाठी शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या बँकेच्या शाखा व्यवस्थापकावर कारवाईचे आदेश दिले आहेत;
परंतु अंढेरा येथील शेतकऱ्यांना शाखा व्यवस्थापकाकडून व्यवस्थित वागणूक मिळत नाही. अंढेरा येथील रहिवासी असलेले दत्तात्रय नामदेव वाघ यांनी १५ मे २०२१ ला एरंडीचे चार क्विंटल २१ किलो बियाणे विकले होते. त्या मालाचा पहिला हप्ता १४ हजार पाचशे रुपये हे विदर्भ-कोकण बँकेच्या बचत खात्यामध्ये १ जून २०२१ रोजी जमा झाला. अंढेरा शाखेचे व्यवस्थापक गौरव जगताप यांनी बचत खात्यामधील आलेले पैसे तुम्हाला काढता येणार नसल्याचे सांगून या खात्याला होल्ड लावलेला आहे, तसेच आपल्याकडील ७३ हजार ५०० रुपये थकीत असलेले पीक कर्ज आधी भरा, मगच तुम्हाला पैसे काढता येतील, असे सांगितले. हा प्रकार लक्षात येताच शिवसेना नेते रावसाहेब देशमुख यांनी शाखा गाठली असता शाखा व्यवस्थापकाने अरेरावीची भाषा वापरत पहिले थकीत पीक कर्ज भरा, असे सांगूण उडवाउडवीची उत्तरे दिली.
शेतकऱ्यांना न्याय द्या
बँकेकडून शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ होते. त्यामुळे बँकेची चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना नेते रावसाहेब देशमुख यांनी केली आहे.