सोयाबीनला भाव द्या, एअरगन दाखवली, संतापलेल्या शेतकऱ्याचे कृत्य; ६ हजार रुपये प्रतिक्विंटलची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2024 14:20 IST2024-01-06T14:20:31+5:302024-01-06T14:20:49+5:30
यावेळी प्रतीकात्मकपणे कृती करत हातात कोयता आणि कमरेला एअरगन लटकवून ‘आता शस्त्र हाती घ्यावे लागणार,’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. रवी महानकर (रा.पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

सोयाबीनला भाव द्या, एअरगन दाखवली, संतापलेल्या शेतकऱ्याचे कृत्य; ६ हजार रुपये प्रतिक्विंटलची मागणी
खामगाव (जि. बुलढाणा) : सोयाबीनला भाव मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारासमोर सोयाबीनचे पोते फाडून ते उलटून दिले. यावेळी प्रतीकात्मकपणे कृती करत हातात कोयता आणि कमरेला एअरगन लटकवून ‘आता शस्त्र हाती घ्यावे लागणार,’ अशा घोषणा दिल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करीत त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. रवी महानकर (रा.पिंपळखुटा, ता. पातूर, जि. अकोला) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
सध्याचा भाव फक्त ४,७०० रु. प्रतिक्विंटल
महानकर यांनी स्वत:च्या शेतीसोबत २५ ते ३० एकर शेती ठेक्याने केली. त्यातील सोयाबीन त्यांनी विकण्यासाठी आणले; परंतु, सध्या बाजार समितीमध्ये प्रतिक्विंटलला जवळपास ४ हजार ७०० रुपयांपर्यंत भाव आहे. किमान सहा हजार रुपये भाव मिळाला तरच उत्पादन खर्च निघेल, असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. त्यामुळे संतप्त होत त्यांनी हातात कोयता व एअरगन घेऊन घोषणाबाजी करीत भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची होणारी कोंडी व्यक्त केली.
उत्पादन खर्चही निघेना
खरीप हंगामात अवकाळी पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या पिकांवर शेतकऱ्यांनी भरमसाट खर्च केला. मात्र, उत्पादन खर्च निघेल एवढाही भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. भाववाढीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी सोयाबीनची साठवणूक केली आहे. मात्र, अल्पभूधारकांनी गरजेपोटी मिळेल त्या भावात विक्री करावी लागत आहे.