आई तुझं लेकरू... आजारी बाळासाठी ट्युबवरुन प्रवास, माऊलीनं पुरातून काढला मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 12:40 PM2022-07-21T12:40:55+5:302022-07-21T12:49:13+5:30

गावाला चारही बाजूने विश्वगंगा नदीने वेढलेले आहे, आणि तालुक्याला येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे

Ai tuzh lekeru... Tube travel for sick baby, Mauli makes her way through flood in buldhana | आई तुझं लेकरू... आजारी बाळासाठी ट्युबवरुन प्रवास, माऊलीनं पुरातून काढला मार्ग

आई तुझं लेकरू... आजारी बाळासाठी ट्युबवरुन प्रवास, माऊलीनं पुरातून काढला मार्ग

Next

बुलडाणा - राज्यासह विदर्भातही गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्याचं दिसून आलं. बुलडाणा जिल्ह्यातही गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. त्यातच मलकापूर तालुक्यातील काळेगाव या गावाचा संपर्क मलकापूर शहरापासून तुटल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण झाली. गावाला चारही बाजुने पाण्याने वेढा दिल्याने गावकऱ्यांना महत्त्वाच्या आणि तातडीच्या सेवेसाठी पुरातून मार्ग काढावा लागला. या पुरातून मार्ग काढत एका आईने लेकाराच्या काळजीप्रती जीवाची बाजी लावल्याचं पाहायला मिळालं. 

गावाला चारही बाजूने विश्वगंगा नदीने वेढलेले आहे, आणि तालुक्याला येण्यासाठी फक्त एकच मार्ग आहे, तो म्हणजे हरसोडा मार्गे मलकापूर. मात्र, मध्ये असलेल्या पुलावरून पाणी वाहत असल्याने गावकऱ्यांना कुठेही जाता-येता येत नव्हते. दरम्यान, गावातील वैशाली अंबादास काळे यांचा देवांश नावाचा चिमुकला अचानक आजारी पडला. पण, गावाला पुराचा वेढा असल्याने त्याला उपचारासाठी दवाखान्यात कसे न्यायचे? असा प्रश्न काळे कुटुंबीयांसह गावकऱ्यांसमोर होता. त्यावेळी टायरवर बसून पुरातून माता आणि चिमुकल्याला उपचारासाठी नेण्याचं धाडस या माऊलीनं केलं. पुराने आलेल्या पाच-सहा फूट खोल पाण्यातून जीव मुठीत धरुन वैशाली यांनी आपल्या चिमुकल्याला उपचारासाठी मलकापूरला आणले. 

आपल्या काळजाच्या तुकड्याचा जीव वाचवण्यासाठी माऊलीची ही धडपड कॅमेऱ्यात कैद झाली असून आजही ग्रामीण भागातील वास्तव दर्शवणारी ही घटना आहे. या धाडसी मातेच्या प्रवासाचा गावातील काही लोकांनी व्हिडिओ काढला, आणि आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र, केवळ व्हिडिओ व्हायरल होऊन मातेचं कौतुक होण्यापेक्षा गावची मूळ समस्या शासन दरबारी पोहोचणे गरजेचं आहे.  
 

Read in English

Web Title: Ai tuzh lekeru... Tube travel for sick baby, Mauli makes her way through flood in buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.