दमदार पावसानंतर जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 14:48 IST2019-07-07T14:48:21+5:302019-07-07T14:48:39+5:30
बुलडाणा : यावर्षीच्या दमदार पावसानंतर ्रप्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये ‘पलढग’ प्रकल्पाची टक्केवारी सर्वाधिक आहे.

दमदार पावसानंतर जलसाठ्यात वाढ
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : यावर्षीच्या दमदार पावसानंतर ्रप्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. जलसाठ्यामध्ये ‘पलढग’ प्रकल्पाची टक्केवारी सर्वाधिक आहे. तर त्यापाठोपाठ ‘मन’ प्रकल्प आहे. मात्र खडकपूर्णा व कोराडी प्रकल्पांच्या मृतसाठ्याची पातळीच अधिक असल्याने सद्यस्थितीत हे दोन्ही प्रकल्प मृतसाठ्यावरच आहेत.
जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. मृग व आद्रा नक्षत्राच्या जोडावर सुरू झालेल्या या पावसाने अद्यापही एक दिवसाच्यावर विश्रांती घेतली नाही. कमी-जास्त प्रमाणात जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सध्या होत आहे. त्यामुळे उन्हाळ्यात तहानलेल्या प्रकल्पांच्या जलसाठ्यात आता वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. आजपर्यंत जिल्ह्यात १७७.३ मि.मी. पाऊस झाला आहे. पर्जन्यमानाच्या तुलनेमध्ये २७.३ टक्के पावसाची नोंद झालेली आहे. जूनअखेर पर्यंत झालेल्या पावसाने जिल्ह्यातील मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पातील मृतसाठ्या इतकी तहान भागविण्याचे चांगले काम केले. मात्र जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्यात वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामध्ये यावर्षी सर्वात पहिले पलढग या मध्यम प्रकल्पाचा जलसाठा वाढल्याचे दिसून येत आहे. पलढग प्रकल्पात ३५.६९ टक्के तर मन प्रकल्पामध्ये २१.१२ टक्के त्यापाठोपाठ तिसऱ्या क्रमांकावर उतावळी प्रकल्प १९.२० टक्क्यावर आला आहे. या सर्व प्रकल्पांचा जलसाठा हा १.०९ ते ८.१० दलघमीच्या आसपास आला आहे. या वाढत्या जलसाठ्यामुळे भविष्यातील पिण्याच्या पाण्याची चिंता मिटल्याचे चित्र दिसून येत आहे.
खडकपूर्णा २३.३९, कोराडी ३.७८ दलघमी
जिल्ह्यातील खडकपूर्णा व कोराडी या दोन्ही प्रकल्पांचा मृतसाठा मुळातच सर्वाधिक आहे. त्यामुळे या प्रकल्पातील मृतसाठ्याइतकी जलपातळी अद्याप वाढली नाही. सध्या खडकपूर्णा प्रकल्पामध्ये २३.३९ दलघमी मृतसाठा व कोराडी प्रकल्पामध्ये ३.७८ दलघमी मृतसाठा आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये जलसाठा मोठ्या प्रमाणावर दिसून येत असला तरी तो सध्या मृतसाठ्यातच गणल्या जातो.