दुचाकीस्वार युवकास कंटेनरने उडवले; एकजण जागीच ठार, चिखली रोडवरील घटना
By भगवान वानखेडे | Updated: September 25, 2022 17:33 IST2022-09-25T17:33:18+5:302022-09-25T17:33:54+5:30
कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

दुचाकीस्वार युवकास कंटेनरने उडवले; एकजण जागीच ठार, चिखली रोडवरील घटना
बुलढाणा : चिखलीकडून बुलढाण्याकडे येणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीस्वार युवकास उडविले. या अपघातात दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. ही घटना २५ सप्टेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता चिखली रोडवर घडली. सुमेध काळे (२२,रा.भीमनगर,बुलढाणा) असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. अपघातानंतर चिखली रोडवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. चिखलीकडून बुलढाण्याकडे येणारा कंटेनर क्रमांक एचआर-३८-टी ५४७४ ने दुचाकी क्रमांक एमएच २८ एएक्स ४०५५ ला जबर धडक दिली. ही धडक एवढी गंभीर होती की, दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला. घटना घडताच नागरिकांनी धाव घेतल्याने एकच गोंधळ उडाला होता. यामुळे चिखली रोडवर तब्बल अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली.
शंभर मीटर अंतरावर कंटेनर सोडून चालक फरार
अपघात स्थळापासून शंभर मीटर अंतरावर पुढे जाऊन कंटेनर चालकाने वाहन सोडून तिथून पळ काढला. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तो कंटेनर शहर पोलीस स्टेशनमध्ये आणून जमा केला. बुलढाणा शहरातील भीमनगर भागात राहणारा मृतक सुमेध काळे हा एकुलता एक मुलगा होता. घटनेची माहिती कुटुंबियाना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून आक्रोष व्यक्त करुन आरोपी कंटेनर चालकास तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.