अवैध गुटखा घेवून जाणारा ट्रक उलटला, घटनास्थळावरून लाखो रुपयांचा गुटखा जप्त
By संदीप वानखेडे | Updated: February 18, 2024 22:17 IST2024-02-18T22:17:08+5:302024-02-18T22:17:47+5:30
माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस प्रशासनाने घटनास्थळावर धाव घेवून लाखो रुपयांचा गुटखा तसेच इतर मुद्देमाल जप्त केला.

अवैध गुटखा घेवून जाणारा ट्रक उलटला, घटनास्थळावरून लाखो रुपयांचा गुटखा जप्त
देऊळगाव राजा : गुटख्याची अवैध वाहतुक करणारा आयशर ट्रक पुलाच्या कठड्यावर धडकून उलटला. ही घटना देऊळगाव राजा ते सिंदखेड राजा रोडवरील जांभोरा नजीकच्या नदी पुलावर १८ फेब्रुवारी राेजी घडली. माहिती मिळताच देऊळगाव राजा पोलीस प्रशासनाने घटनास्थळावर धाव घेवून लाखो रुपयांचा गुटखा तसेच इतर मुद्देमाल जप्त केला.
दिवसाढवळ्या अवैध गुटखा वाहतूक करणारे मालवाहू आयशर ट्रक क्रमांक एमएच १६ सीडी २३०८च्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पुलावरील कठड्यावर ट्रक आदळला़ त्यामुळे, हा ट्रक नदीपात्रात उलटला. त्यामध्ये असलेला लाखाे रुपयांचा गुटखा रस्त्यावर पडला. ट्रक चालक मद्यधुंद असल्याने अपघात घडल्याचे घटनास्थळावर उपस्थित असलेल्या नागरिकांनी तसेच पाेलिसांनी सांगितले़ ट्रक उलटल्यानंतर त्यामध्ये असलेला लाखाे रुपयांचा गुटखा नदीपात्रात अस्ताव्यस्त पडला हाेता. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तसेच गुटखा शौकिनांनी एकच गर्दी केली होती. देऊळगाव राजा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, भास्कर सानप इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून अवैध गुटखा जप्त केला.वृत्त लिहीस्ताेवर गुटख्याची माेजमाप सुरू हाेती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरू हाेती.